वाळूज महानगर, (ता.9) – नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असलेल्या एका सुरक्षारक्षकाची दुचाकी व भरधाव जाणारा ट्रक यांच्यात अपघात होऊन दुचाकी ट्रकखाली आल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची घटना सोमवारी (ता.9) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील साजापूर चौफुलीवर घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील सुरक्षारक्षक सदाशिव भाऊराव लिपणे हे सोमवारी (ता.9) रोजी सकाळी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी (एमएच 20,एफझेड -4750) वरून दौलाताबाद येथे जात होते. त्याचवेळी ए.एस.क्लबकडून लासूर स्टेशनकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक (आरजे 40 जीए-0456) आला. या दोन्ही वाहनांमध्ये जोराची धडक झाली. या अपघातात सदाशिव लिपणे हे दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव ट्रकचे चाक सदाशिव लिपणे यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर सोलापूर-धुळे पथकर नाक्यावरील रुग्णवाहिकेने नागरिक व पोलिसांच्या मदतीने सुरक्षारक्षक लिपणे यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन लिपणे यांना मृत घोषीत करण्यात केले. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक गणेश गिरी करीत आहे.