वाळूजमहानगर, (ता.29) – ट्रक समोर कार आडवी लावून ट्रक चालक व क्लीनरला मारहाण करत 400 बॅग खतासह ट्रक लंपास करणाऱ्या 6 आरोपींना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 24 तासातच जेरबंद केले. या आरोपीमध्ये एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. आरोपीच्या ताब्यातून 15 लाख 72 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली कार व दुचाकी जप्त करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आळंद ता. फुलंब्री येथील योगेश अशोक काकडे (28) व क्लीनर लक्ष्मण खमाट हे ट्रक (एम एच 41, एयु-3809) ट्रकमध्ये 400 बॅग खत भरुन तसेच ट्रकचे 20 हजार रुपये भाडे आगाऊ घेऊन सिल्लोडला पोहोच करण्यासाठी जात होते. मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील ए एस क्लबजवळ आले असता कार (एम एच 02, सीएल -2276)च्या चालकाने ट्रकसमोर कार आडवी लावली. अचानक ट्रकसमोर कार आल्याने चालक योगेश काकडे याने ट्रक उभा करताच कारमधील तीन अनोळखी इसम कारमधुन खाली उतरले. यानंतर काही वेळातच काळ्या रंगाच्या दुचाकी (एम एच 28, बी ई -6048) वर ट्रिपल सीट आलेल्या कारचालकांच्या साथीदारांनी ट्रकचालक योगेश काकडे व क्लिनर लक्ष्मण खमाट यांना शिवीगाळ करुन ट्रकच्या खाली ओढले. त्यानंतर चालकाच्या खिशातील 20 हजार रुपये हिस्कावुन घेतले. तसेच ट्रकचालक व क्लिनर यांना हात-पाय तोडण्याची धमकी देत लाकडी दांड्याने बेदम मारहाण करीत ट्रकच्या काचा दगडाने फोडल्या. रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी कुणीही न आल्याने जीव वाचविण्यासाठी चालक योगेश काकडे व क्लिनर लक्ष्मण खमाट हे दोघे दरोडेखोरांच्या तावडीतुन सुटुन वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. त्यानंतर दरोडेखोरांनी 2 लाख 73 हजाराच्या 400 खताच्या बॅग व 13 लाखाचा ट्रक असा एकुण 15 लाख 92 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
24 तासातच आरोपी जेरबंद
या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी शुभम बाबासाहेब मोरे वय 20 वर्ष, रा. तिसगाव, शंतनु बबनराव जगताप वय 18 वर्ष, रा. सिडको महानगर, यज्ञेश संतोष गवळी वय 22 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, तिसगाव, स्वामी लालचंद सलामपुरे वय 21 वर्ष, रा. गोलवाडी, तुषार सुरज तुर्की वय 20 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, तिसगाव व एक विधीसंघर्ष बालक वय-17 वर्ष रा.सिल्क मिल्क कॉलनी, महानुभव आश्रम जवळ छत्रपती संभाजीगनर यांना ताब्यात घेतले. त्यांना पॉलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करत तिसगावला जाणार्या कच्या रस्त्यावर लपवून ठेवलेला चोरीतील ऐवज काढून दिला. पोलिसांनी 13 लाख रुपये किंमतीची टाटा ट्रक (एम एच 41, ए यु -3809), 2 लाख 72 हजार रुपये किंमतीच्या व रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खताच्या 400 बॅग तसेच गुन्ह्यात वापरलेली 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची कार व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोनि. जयंत राजूरकर, सपोनि. मनोज शिंदे, पोउपनि. संदीप शिंदे, विवेक जाधव, पोलीस अंमलदार जालिंदर वाखुरे, सुरेश भिसे, नितीन इनामे, हनुमान ठोके, यशवंत गोबाडे, गणेश सागरे, समाधान पाटील, विठ्ठल शिंगाडे, पोलीस हवालदार जालिंदर रंधे यांनी केली.