वाळूजमहानगर, (ता.10) – तीन जणांनी गावातील बौध्द विहारासमोर बोलावून दोन हजार रुपये उसने मागितले. ते न दिल्याने 21 वर्षीय तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 9) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टोकी येथे घडली.
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा – अनिकेत भिमराव शेजवळ (वय-21) रा. टोकी हा फॅब्रिकेशनचे काम करतो. रविवारी (ता. 9) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गावातील मित्र अजय पांडुरंग शेजवळ याने अनिकेत याला फोन करून गावातील बौध्द विहाराकडे येण्याचे सांगितल्याने अनिकेत व त्याचा लहान भाऊ प्रेम शेजवळ असे दोघे बौध्द विहाराजवळ गेले. त्या ठिकाणी अजय शेजवळ, अमोल पाचवणे, सचिन काळे हे उभे होते. तेथे गेल्यावर अजय शेजवळ याने अनिकेतला दोन हजार रुपये उसने मागितले. त्यास नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत हाताचापटाने मारहाण करु लागले. म्हणुन प्रेम हा भांडण सोडवित असताना अजय शेजवळने अनिकेतच्या पोटात चाकु खुपसला. या घटनेत अनिकेत हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अजय शेजवळ, अमोल पाचवणे व सचिन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.