
वाळुज महानगर, (ता.26) – कंपनीतून निघाल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील जिकठाण फाटा येथे झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबूसिंग सोबकचंद महेर (वय 45) रा. पेंडापुर (हल्ली मुक्काम ढोरेगाव) हा कामगार बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास हेल्मेट घालून दुचाकी (एम एच 20, डी यु – 0541) वर ढोरेगाव येधून लिंबे जळगाव कडे येत होता. त्याचवेळी जिकठाण फाटा येथील ग्रिन-पॅक कंपनी मधून आलेल्या आयशर एम एच 20, सी टी -0843) या टेम्पो चालकाने विरूध दिशेने भरधाव येऊन महेर याच्या दुचाकीला जोराचे धडक दिली. असे एका प्रत्यक्ष दर्शने सांगितले. या अपघातात महेर हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच भोसले ॲम्बुलन्स चालक शुभम वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार डी वाय अवधूत यांच्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या अपघातात ठार झालेल्या बाबू सिंग मेहेर यांनी दुचाकीवर हेलमेट घातलेले होते. मात्र अपघात भीषण असल्याने महेर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची सखोल चौकशी करून आयशर टेम्पो चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे व जीवनदूत म्हणून ओळखल्या जाणारे दहेगाव येथील गणेश राऊत यांनी केले.
