
वाळूजमहानगर, (ता.26) – भागीदारी सुरू केलेल्या टूलिंगच्या व्यवसायात बहिण भावाने विश्वासघात करून एका व्यवसायिकांची 22 लाख 43 हजार 610 रुपयाची फसवणुक केली. शिवाय लिहून दिलेल्या धनादेशाची रक्कम परत न करता शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बहिण-भावंडाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या प्रकारामुळे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूजमहानगर येथील बालाजी एकनाथ भाकड (44) यांचे वाळूज औद्योगिक परिसरात नाथ इंजिनिअरींग या नावाचे शॉप आहे. त्यामुळे बालाजी भाकड यांच्या शॉपमध्ये धनंजय व्यंकटराव इंगळे (24), रा.मांगवडगाव ता.केज, ह.मु.वाळूजमहानगर हा स्तुलिंग घेऊन येत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. या ओळखीनंतर धनंजय इंगळे याने बालाजी भाकड यांना भागीदारीत टुलिंग विक्रीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. यानंतर बालाजी भाकड यांनी इंगळे याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला. या व्यवसायत टुलिंग खरेदीसाठी भाकड यांनी वेळोवेळी इंगळे यांच्या बँक खात्यात धनादेशाद्वारे रोख स्वरूपात 30 लाख 66 हजार 135 रुपये दिले. दरम्यान इंगळे याची बहिण वसुंधरा अरुण सोळंके (रा.काल्डा कॉर्नर) ची भेट झाली. तीने सुद्धा टुलिंगचा व्यवसाय करते. आम्ही दोघे बहिण भाऊ मिळून व्हीएस इंटरप्राईजेसचे काम पाहतो. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाकड यांनी त्यांच्यासोबत टुलिंग विक्रीचा व्यवसाय सुरु केला. काही दिवस हा व्यवसाय सुरळीत चालल्यानंतर भाकड यांनी दिलेल्या पैशातुन दोघा बहिण-भावंडाने टुलिंग खरेदी करुन भाकड यांना न देता ते परस्पर दुसर्या ठिकाणी विक्री करुन बनावट पावत्या दिल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाकड यांनी इंगळे यास जाब विचारला असता त्याने चुक झाल्याची कबुली देत धनादेशही लिहून दिले. मात्र ते धनादेश न वटल्यामुळे भाकड यांनी इंगळे याची घरी जाऊन 24 मार्च 2022 ते 7 मे 2022 दरम्यान दिलेले 22 लाख 43 हजार 610 रुपये परत मागीतले. त्या वेळी वसुंधरा सोळंके व त्यांच्या कुटुंबियांनी भाकड यांची समजुत काढत पैसे परत करण्यासाठी आणखी वेळ मागीतला. दरम्यान मुदत संपवूनही हे दोघे बहिण-भाऊ पैसे परत करीत नसल्याने भाकड यांनी पैशासाठी सतत तगादा लावला. सततच्या तगाद्यानंतर इंगळे याने भाकड यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बालाजी भाकड यांच्या फिर्यादीवरून आरोपी बहिण भावाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
