
वाळूजमहानगर, (ता.23) – पत्त्यावर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 7 जुगार्यांवर पोलिसांनी छापा मारून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 9 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी वाळुज येथील बजाजनगरच्या साई श्रध्दा गेस्ट हाउस (लॉज) येथील रुम मध्ये काही इसम पत्यावर पैसे लावुन झन्ना मन्ना नांवाचा जुगार खेळत आहे. अशी माहिती पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 1 चे ऋषिकेश सिंगारेड्डी यांना मिळाल्याने त्या ठिकाणी छापा मारला असता तेथे मंगेश सुभाष परदेशी (वय 34 वर्ष) रा. वाळुज, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजिनगर, आकाश पारसचंद साकला, (वय 28 वर्ष) रा. झेंडा चौक, वाळुज, दिनेश बिसनसिंग धुनावत (वय 34 वर्ष) रा. शिवराई गाव, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर, संतोष संजय सुर्यवंशी, (वय 32 वर्ष) रा. मथुरानगर, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर, अजय रोहिदास गांगुर्डे, (वय 25 वर्ष) रा. रांजणगाव, कमलापुर फाटा, छत्रपती संभाजीनगर, अबुजर आयुब पठाण, (वय 25 वर्ष) रा. सम्राट शाळेजवळ, वाळुज पंढरपुर, छत्रपती संभाजीनगर व बाळक्रष्ण तुकाराम मोहिते, (वय 36 वर्ष) रा. आयप्पा मंदिराजवळ, छत्रपतीनगर, सातारा परीसर, छत्रपती संभाजीनगर हे पत्त्यावर पैसे लावुन झन्ना मन्ना नांवाचा जुगार खेळतांना मिळुन आले. त्यांच्याकडुन रोख रक्कम व इतर साहीत्य असा एकुण 4 लाख 9 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो सविस्तर जप्ती पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या सर्व जुगारींवर इसमाविरुध्द पोअं धर्मराज गायकवाड यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 45 प्रमाणे कायदेशिर फिर्याद देवुन पो.स्टे. एम. आय. डी. सी. वाळुज येथे गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, पोअ धर्मराज गायकवाड व सुरेश भिसे यांनी केली.
