March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.9) – एकाच प्रेयसीवर प्रेम करणाऱ्या दोन जिवलग मित्रांमध्ये वाद होऊन एकाने चाकूने भोसकून दुसऱ्याचा खून केला.त्यांनतर फरार झालेल्या आरोपींना पोलीसांनी परभणी येथून गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी ताब्यात घेऊन गजाआड केले. वाळुज येथे घडलेल्या ‘एक फुल, दो माली’ या प्रकरणातील दोन माळी (गार्डनर) वर घटनेनंतर अवघ्या चारच तासात वाळूज पोलिसांनी कारवाई केली. मात्र या प्रकरणातील ते फुल कोण? याची उत्कंठा सर्वांना लागली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस ठाणे वाळुज अंतर्गत नारायणनगर लांझी रोड येथे बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास प्रथमेश प्रभाकर गायकवाड वय 20 वर्ष रा. नारायणनगर याचा चाकुने भोसकुन निघृण खून करण्यात आला होता. या घटनेची माहीती मिळताच वाळुज पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहीती काढून खुनाचे धागेदोरे शोधुन आरोपीची नावे निष्पण केली. व वेगवेगळी पथके तयार करुन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने आरोपींचे लोकेशन वेळोवेळी ट्रेस केले. या गुन्ह्यातील आरोपींचा रात्रभर माग काढला. सकाळी 8 वाजेच्या सुमारास आरोपी रितेश सुनिल नरवडे वय 21 वर्ष रा. नारायणनगर वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर व प्रदिप बाबासाहेब सुकासे वय 19 वर्ष रा. झेंडा मैदान ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांना रेल्वे स्टेशन परभणी येथून ताब्यात घेण्यात आले. या घटनेतील मयत प्रथमेश व आरोपी हे बालपणा पासुन मित्र होते. व मागील काही महीन्यापासुन त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरणातुन वैमन्यस निर्माण झाले होते. अशी प्राथमिक माहीती पोलिसांनी यावेळी दिली असुन घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे हे करीत आहे.


               तीन पथकांनी केले शोधकार्य –
वाळूज येथे खून झाल्याची माहिती मिळतात घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी तीन वेगवेगळे पथक स्थापन केले. त्यातील पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे यांचे पथक परभणी, पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड यांचे पथक वाळुज एमआयडीसी परिसर व पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ यांच्या पथकाने शेंद्रा, करमाड परिसरात आरोपींचा रात्रभर शोध घेतला.

              हुलकावणी देण्यापूर्वीच झडप –
दरम्यान प्रथमेश गायकवाड याचा खून केल्यानंतर आरोपी नरवडे आणि सुखाचे राज्यराणी एक्सप्रेसने परभणीला गेले. तेथून पोलिसांना हुलकावणी देऊन ते हैदराबादला जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वेची वाट पाहत रेल्वे स्थानकावर बसले होते. मात्र हैदराबाद जाणारी रेल्वे येण्यापूर्वीच वाळूज पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली.

             चारच तासात आरोपी गजाआड –
जिवलग मित्राचा खून केल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करून आरोपी रितेश व व त्याचा मित्र प्रदीप हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर गेले. तेथून ते परभणी मार्गे हैदराबादला जाणार होते. त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांनी ब्लँक मेसेज टाकला. स्टेशनवर असताना स्विच ऑफ असलेला मोबाईल आरोपीने उघडला. आणि पोलिसांच्या मोबाईलवर ‘टुमकन’ आवाज आला. त्यामुळे पोलिसांना आरोपीचे लोकेशन मिळाले, आणि अवघ्या चारच तासात आरोपी गजाआड झाले.

                 यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदिप वाघ, नारायण बुट्टे, पोअं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, पोह. संदिप धनेधर, शेख गफ्फार, श्रीकांत सपकाळ, स्नेहलकुमार गवळी व पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *