March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.6) – काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जिवंत काडतुस व पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या 24 वर्षीय आरोपीला जेरबंद करून त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व 1 हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा 31 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शाखेने शनिवारी (ता.4) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईमुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील मोठा घातपाताचा प्रकार टाळला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गजानन टक्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नजीर पठाण, शिपाई संदीप बिडकर, विजय भानुसे असे शासकीय वाहनातून शनिवारी (ता.4) रोजी पोलीस आयुक्त हद्दीत ग्रस्त घालीत असताना ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील तिरंगा चौकात आले. तेथे त्यांना साडेसहा वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील बस स्टॅन्डजवळ काहीतरी गंभीर स्वरूपाचा घातपात करण्याच्या उद्देशाने एक इसम कमरेला पिस्तूल लावून उभा आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के व त्यांच्या पथकाने रांजणगाव (शेणपुंजी) येथे धाव घेत माहितीतील मिळालेल्या वर्णनाच्या एका 24 वर्षीय तरुणास पकडले. पंचा समक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे व लाकडी मूठ असलेले गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले. 30 हजार रुपयाचे हे पिस्तूल व 1 हजार रुपयाचे जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे.

आकाश अवध किशोर यादव (वय 24) रा. बौद्ध विहाराजवळ गांधीनगर, रांजणगाव (शेणपुंजी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी (ता.4) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील घातपाताची मोठी घटना टळली. शस्त्र अधिनियम 1959 कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे तसेच पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस नाईक परभत रामसिंग म्हस्के यांच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश अवध किशोर यादव रा. रांजणगाव (शेणपुंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *