March 23, 2026


वाळूज महानगर, (ता. 3) – जिकठाण येथील श्री खडकेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात 29 एप्रिल ते 17 मे पर्यंत 21 दिवसांचे वारकरी बाल सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बकवालनगर, नवाबपूर वाडी, वडाचीवाडी, भगतवाडी, जिकठाण ता. गंगापूर, भगूर ता. वैजापूर, बिडकीन, भालगाव ता.फुलंब्री येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.

या शिबिरात पखवाज व हार्मोनियम वादन, अभंग गायन, संस्कृत भाषेची ओळख,भगवत गीतेतील पंधरावा अध्याय, हरिपाठ, वक्तृत्व कला, पावल्या, जुन्या नाट्यसंगीताच्या चाली याविषयी ह.भ.प.कृष्णा महाराज भवर, ह.भ.प.अक्षय महाराज आहेर यांनी सहा ते सोळा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे दिले. ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल यांच्यावतीने आयोजित या शिबिरास देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, गाथा मूर्ती ह. भ.प.रामभाऊ महाराज राऊत, ह.भ. प. पद्माकर महाराज पाचोळे यांचा आशीर्वाद व धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे (तुर्काबाद खराडी), ह भ प. दादा महाराज वायसळ यांचे मार्गदर्शन लाभले.

या शिबिरास रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर (अकोला) यांनी सदिच्छा भेट दिली. संपूर्ण शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांची जिकठाण येथील ग्रामस्थांनी भोजन व नाश्त्याची व्यवस्था केली. समारोप प्रसंगी डॉ ज्ञानेश्वर नीळ, कैलास महाराज खोमणे, अरुण बोडखे, भरत रोकडे, सोमीनाथ खोमणे यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यवस्था –
ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्था गुरुकुलचे भागवताचार्य कृष्णा महाराज भवर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. हे मर्म ओळखून जिकठाण येथील या गुरुकुलात शालेय विद्यार्थ्यांची वर्षभर निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *