वाळुज महानगर, (ता.30) – अनेक आरोप प्रत्यारोपात व जमाखर्चाच्या हिशोबासह ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते रस्ते, नाल्या, ड्रेनेजलाईन, पिण्याचे पाणी, नमुना नंबर 8, गैरहजर ग्रामपंचायत कर्मचारी. अशा गावातील विविध प्रश्नाच्या सरबत्तीत व गदारोळात राजुरा येथे ग्रुप ग्रामपंचायत मलकापूरची ग्रामसभा शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी गाजली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात झालेली ही ग्रामसभा सुमारे 6 तास सुरू होती.
सोमवारी 25 ऑगस्ट रोजी आयोजित केलेली व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार न झालेली मलकापूर, शिरुडी राजुरा या ग्रुप ग्रामपंचायतची ग्रामसभा शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी राजुरा या गावात आयोजित करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाऊसाहेब माळी होते.
सकाळी साडेदहा वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू झालेली ही ग्रामसभा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती. या ग्रामसभेत ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामनिधी मधून करण्यात आलेल्या विविध कामांचा जमा खर्च तसेच 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापराबाबत चर्चा करण्यात आली. मलकापूर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये 15 व्या वित्त आयोगाचा 28 लाख रुपये निधी खर्चा अभावी पडून आहे.
मात्र हा निधी नेमका कुठे आणि कोणत्या गावात वापरावा. यावर राजुरा येथील शुक्रवारच्या ग्रामसभेत एकमत झाले नाही. तसेच गेल्या वर्षी ग्रामनिधीतून करण्यात आलेल्या जवळजवळ 13 लाख रुपये खर्चाच्या कामाच्या जमाखर्चाबाबत राजुरा, मलकापूर आणि शिरुडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर चांगलेच ताशेरे ओढत हिशोब मागितला. शेवटी ग्रामपंचायत अधिकारी के एम इंगोले यांनी या जमाखर्चेचा हिशोब वाचून दाखवला. त्यात बरीच तफावत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी या जमाखर्चाबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन कामाची व खर्चाबाबतची चौकशी करण्यात यावी.
अशी मागणी करून तो ठराव पास करून घेतला. तसेच ग्रुप ग्रामपंचायत मलकापूर अंतर्गत गावातील विविध रस्ते नाल्या ड्रेनेज लाईन पिण्याचे पाणी व सतत गैरहजर राहणारे ग्रामपंचायत कर्मचारी नमुना नंबर आठ अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्याने गोंधळ उडाला.
त्यामुळे ग्रामसभेदरम्यान बंदोबस्तात असलेले वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश लक्कस, होमगार्ड कृष्णा जाधव, अनिल निकम, शरद सूर्यवंशी, संभाजी पवार आदींनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ही ग्रामसभा शांततेत झाली.
या ठरावावर झाली चर्चा –
या ग्रामसभेत पी एम सूर्यघर योजना, पी एम कुसुम सूर्यघर योजना, भटक्यात जनावरांचे व्यवस्थापन, पंचायत प्रगती सूचकांक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी कमी करणे, ग्राम रोजगार सेवक कमी करणे, अशा सेविका यांच्या रिक्त झालेल्या पदाबाबत चर्चा करणे, सन 2022 पासून झालेल्या कामांची चौकशी करणे, आदिशक्ती अभियान राबवणे व चर्चा करणे, असे ठराव घेण्यात आले.
ग्रामसभेला यांची होती उपस्थिती –
या ग्रामसभेला उपसरपंच कासाबाई सावंत, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा बोरुडे, दत्तात्रय लक्ष्मण बोबडे, रहिदास बत्तीशे, कुंदन माळी, गजानन बोबडे, प्रवीण खरात,विठ्ठल बोबडे, भगवान कर्डिले, सुरेश डोंगरजाळ, शिवाजी कर्डिले, विलास जाधव, श्रीराम जाधव, नारायण सावंत, नारायण वैद्य, सचिन फोलाने, श्रीधर कर्डिले, बी एस चामे, काकासाहेब सावंत, पांडुरंग बोबडे, पूनमचंद डोंगरजाळ, रामसिंग ताटू, दीपक फोलाने, सविता बोबडे, भानुदास जाधव, बाबुराव बोबडे, रामनाथ सावंत, सुनील खरात, भीमराव बत्तीशे, आकाश बोबडे, सुधाकर सावंत, संदीप दहातोंडे, गणेश बत्तीशे यांच्यासह राजुरा, मलकापूर आणि शिरुडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
