वाळूजमहानगर, (ता.28) – कामगार व व्यवसायानिमित्त आपण ज्या भूमीत आलो. त्या कर्मभूमीचा तसेच आपण ज्या भूमीत जन्मलो त्या मातृभूमीचा अभिमान बाळगणे ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आपण जपलीच पाहिजे. असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री तथा बिदर (कर्नाटक) चे खासदार भगवंत खुबा यांनी बजाजनगर येथे मंगळवारी (ता.27) रोजी केले.
कामगार, उद्योग व व्यवसायानिमित्त अनेक जण कर्नाटक राज्यातून वाळूज औद्योगिक वसाहतीत आलेले आहेत. बजाजनगर येथे हे सर्वजण स्थायिक झालेले आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. याप्रमाणे या सर्वांनी मिळून मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाची स्थापना करून दोन्हीही राज्याच्या संस्कृतीचे जतन करत आहे.
म्हणजेच कर्नाटक या जन्मभूमीचा व महाराष्ट्र या कर्मभूमीचा ते अभिमान बाळगतात. बिदर (कर्नाटक) चे खासदार तथा केमिकल अँड फर्टीलायझर विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी मंगळवारी (ता.27) रोजी बजाजनगर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी भगवंत खुबा यांनीही येथे आलेल्या कर्नाटक वाशीयांना मार्गदर्शन करत भारतात कोठेही रहा, परंतु आपल्या जन्म भूमीचा व कर्म भूमीचा अभिमान बाळगा. असे आवाहन केले. तसेच विविधतेत एकता ही आपली संस्कृती टिकून ठेवण्याचाही सल्ला दिला.
प्रथम केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने फटाक्याच्या आतिषबाजीत औक्षण करून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी श्रुष्टी स्वामी हिने सुमधुर स्वागत गीत गायिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीनिवास तेलंग यांनी केले.
बजाजनगर येथे श्रीनिवास नंदमुरी यांच्या ऑर्चिड टेक्नो शाळेत झालेल्या या कार्यक्रमास मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष केशवप्पा होनाळी, सचिव श्रीनिवास तेलंग, उपाध्यक्ष मोहम्मदसाब नदाफ, कोषाध्यक्ष गुरु चिंचोळी, सदस्य – साई रेड्डी, गिरीश कुमार, किरण कुलकर्णी, भारती राजन्नवर, भाग्यश्री तेलंग, कलावती होनाळी, नागम्मा चिंचोळी, अनिता रेड्डी, अर्चना रेड्डी, विनूता म्हैसूरमठ, ख्वाजावी नदाफ, राजेंद्र कोसणे, सचिन लोहार, राजेंद्र चौधरी आदींसह कर्नाटक राज्यातील कामगार, व्यावसायिक व उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
