वाळुंज महानगर, (ता.31) – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे की, 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजसेवा. मात्र मी त्याही पुढे जाऊन 100% समाजसेवा करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहेत. मी आता रिटायर झालो आहे. उरलेल्या आयुष्यात मला जनतेची सुरक्षा आणि समाजसेवा करण्याची संधी द्या. असे मार्गदर्शनपर आवाहन वाळूज गटातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा युतीचे अधिकृत उमेदवार बालाजी सोनटक्के यांनी शनिवारी 31 जानेवारी रोजी केले.
सध्या राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून वाळुज परिसरातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. वाळुज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बालाजी रघुनाथ सोनटक्के यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. तर पंचायत समिती गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ.बा.ठा.) पक्षाच्या आशाबाई संजय शिंदे या उमेदवार मैदानात उतरल्या आहेत.
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व उ.बा.ठा. या दोन्ही पक्षांची अधिकृत युती झाल्यामुळे निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने प्रचारासाठी मोठी ताकद निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शनिवारी 31 जानेवारी रोजी वाळुज येथील हॉटेल भोंडवे पॅलेस येथे युतीचा संयुक्त मेळावा उत्साहात झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य शेख जमिल, अमजदखा पठाण, नदीम झुंबरवाला, तालुका उपप्रमुख मनोज पिंपळे, बबन गायकवाड, युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेरा आरगडे, सौरभ वैद्य, लिंबे जळगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा पिंपरखेडाचे माजी सरपंच नारायण चनघटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब आरगडे, नारायणपूरचे सरपंच नासेर पटेल, मछिंद्र दळे पाटील, तात्यासाहेब देवढे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन मुंढे, लक्ष्मण राऊत, तुळशीराम दाणे, इस्माईलखा पठाण, विश्वनाथ थोरात, सर्कल प्रमुख बाळासाहेब चनघटे, महेश पवार, पोपट बनकर आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने व जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. युतीमुळे पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत वाळुज गटात रंगतदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
