
वाळूजमहानगर, (ता.25) – अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष तथा छावा श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड शिवाजीराव मोहनराव पा. मार्कंडे (वय 44) रा.बजाजनगर यांचे शनिवारी (ता.24) रोजी हरिद्वार येथे निधन झाले. ते मुळ देवी निमगाव ता.आष्टी, जि.बीड येथील रहिवासी होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवाजी मार्कंडे हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनीचे कामगार होते. छाप पाडणारी भाषण शैली व संघटन कौशल्यामुळे ते कामगारांचे लोकप्रिय कॉम्रेड नेते बनले. अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांनी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती. मार्कंडे पाटील यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, माथाडी यांसह मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील एकमेव आक्रमक छावा जिल्हाध्यक्ष म्हणून मार्कंडे पाटील यांची ओळख होती. काम करत असताना त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व जाती धर्मातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी व्यवस्थापना व प्रशासना विरोधात विविध आक्रमक आंदोलने करून कामगारांना नेहमी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांच्या अनेक कंपन्यामध्ये छावा श्रमिक कामगार संघटना या नावाने युनियन आहेत. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. ते हरिद्वार येथे असताना शनिवारी (ता.24) रोजी हरिद्वार येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने कामगार वर्गात व मराठा समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजतात कामगार क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्यावर उद्या 26 डिसेंबर सोमवारी रोजी सकाळी 11 वाजता देवी निमगाव (ता.आष्टी, जि.बीड) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भावंडे असा परिवार आहे.
