March 23, 2026

* वाळूज महानगरात ट्रांसपोर्टवर पोलिसांचा छापा,
*41 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
*12 आरोपी अटकेत
*नशेडी औषधांचे 20 बॉक्स व 2504 बाटल्या
*एकूण 12 लाख 43 हजारांचा माल जप्त

वाळुज महानगर, (ता.13) – वाळूज ठाण्यापासून अंदाजे एक दीड किलोमीटर असलेल्या नवीन शिवराई या पुनर्वसित गावा शेजारील व्हिआरएल या नामांकित ट्रांसपोर्ट कंपनीच्या गोडाउनवर पोलिसांनी शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी अचानक छापा मारला आणि नशेच्या छुप्या बाजारात विक्री होत असलेल्या रायट्स नावाच्या औषधीच्या बाटल्याचे 12 लाख 43 हजार रुपये किमतीचे 20 बॉक्स जप्त केले.

छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी 13 सप्टेंबर रोजी माहिती दिली की,आयुक्तालयाच्या हद्दीत नशेखोरी, अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

यामुळे पोलिसांची क्राइम ब्रांच, अमली पदार्थ प्रतिबंध शाखा (एनडीपीएस) व स्थानिक पोलिस ठाणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नशेखोरीचे एकूण 251 गुन्हे दाखल केले. यात 365 आरोपींना अटक करून जवळपास 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला.

वाळूजमहानगरात दुसरी मोठी कारवाई –
पोलिसांनी शुक्रवारी व्हिआरएल ट्रान्सपोर्टच्या वाळूज येथील गोडाऊनवर केलेली वाळूज महानगरातील ही दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी साजापूर येथील भंगारच्या गोडाऊनवर छापा मारून एमडी ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
पोलिस क्राइम ब्रांचचे उपायुक्त रत्नाकर नवले यांना काही महिन्यांपूर्वी गुप्त माहिती दाराकडून या रॅकेट बद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी ट्रान्सपोर्ट, कुरिअर, पार्सल व्यवसायावर पाळत ठेवली होती.

त्यामुळे पाळतीवर असलेल्या पोलिसांना उत्तर प्रदेश येथून वाळूजच्या व्हिआरएल ट्रांसपोर्ट येथे हा नशेच्या बाजारात विकला जाणारा औषधांचा माल शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी येणार असून हा माल लगेच घेऊन जाण्यासाठी आरोपी अविनाश रामकृष्ण पाटील रा. चाळीसगाव हा वाळूज येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या ट्रान्सपोर्ट परिसरात सापळा रचला होता.

अखेर आरोपी अविनाश पाटील व त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार आरोपी समीर शेख, अर्शद इब्राहिम पठाण व मन्सूर असे चार आरोपी या ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात पोहचताच पोलिसांनी अचानक या गोडाऊनवर छापा मारला. पोलिसांची ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


यात पोलिसांनी 12 लाख 43 हजार रुपये किमतीच्या 20 बॉक्स मधील 2 हजार 504 नग रायटस नावाच्या कोडिन फॉस्फेक्ट हे गुंगी असणारे रसायन असलेल्या औषधांच्या द्रवरूप बाटल्या जब्त करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींचे नाशिक कनेक्शन
या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, हा माल आरोपीच्या ओळखीच्या व नशे खोरीच्या गोरख धंद्यात सामील असलेला आरोपी अमोल येवले याला पारेगाव ता. येवला जि. नाशिक येथे ताब्यात घेऊन अटक केली.

पारेगाव येथे अस्तित्वातच नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावावर हा औषधींचा माल बनावट कागदपत्रांच्या आधारे व वाहतुकीच्या पावत्या तयार करून नशेच्या बाजारात विकण्यासाठी मागवला होता. असे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी अविनाश पाटीलचा भाऊ रुपेश पाटील याला नाशिक येथे ताब्यात घेऊन अटक केली आहे.

41 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात एकूण 41 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींना शनिवारी गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हा गुन्हा संघटित स्वरूपाने करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

 यांनी घेतला कारवाईत सहभाग
या कारवाईत पोलिस उपायुक्त रत्नाकर चव्हाण, क्राइम ब्रांचचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, अमली पदार्थ प्रतिबंध (एनडीपीएस) च्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, विनायक शेळके,विशेष शाखेचे सपोनी चवरे, पोलिस उप निरीक्षक अमोल म्हस्के, संदीप शेळके, ब्रिजेश चिखलीकर, अतुल कदम व पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ही कारवाई सुरू असताना या ट्रान्सपोर्ट गोडाऊनला भेट देऊन पथकाला आवश्यक मार्गदर्शन केले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *