March 23, 2026

*सिडको वाळूज महानगरात धक्कादायक घटना, *रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

वाळुज महानगर, (ता.19) – जिममध्ये योगा करून घरी परतणाऱ्या 24 वर्षीय तरुणीचे तोंड दाबून एका अज्ञात दुचाकीस्वाराने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने वेळीच धाडस दाखवत रणरागिनी बनून त्याच्याशी दोन हात करत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. सिडको वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास एमएसईबी कार्यालयाजवळील गार्डनलगतच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे धाडसी तरुणीचे कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 24 वर्षीय तरुणी घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात आरोपीने तिचे तोंड दाबून खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र धाडस दाखवत तरुणीने रणरागिनी बनून त्याच्याशी दोन हात करत आरडाओरडा केला. तिच्या आवाजाला प्रतिसाद देत आसपासचे नागरिक वेळीच धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला.
शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण सिडको वाळूज महानगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

             घटनास्थळी कायम अंधार –
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण कायम अंधारात असून, रात्रीच्या वेळी येथे पोलिसांची गस्त होत नाही, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथे विद्युत दिवे लावून प्रकाशाचे व्यवस्था करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे.

                  रात्रीची गस्त वाढवावी –
या परिसरात नेहमीच अंधाराचे साम्राज्य असल्याने मवाली तरुणांना वाव मिळतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, तसेच या मार्गावर योग्य प्रकाशयोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *