March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.18)- वाळूज येथील कंपनीत पोहोच करण्यासाठी दिलेले लाखो रुपये किमतीचे स्टील ट्यूब व पाईप टेम्पोसह चोरी झाल्याची फिर्याद येताच वाळूज पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी टेम्पो चालकाला जेरबंद करून त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी ता 17 रोजी वाळूज पोलिसांनी केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल गायके यांच्याकडे टाटा कंपनीच्या दोन 407 टॅम्पो असुन त्या ए. एन. एस. स्टील ट्युब लिमेंटेट कंपनी, जिकठाण फाटा, ता. गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कंपनीत भाडेतत्वावर लावले आहेत. त्यामध्ये ए.एन.एस. स्टील ट्युब लिमेटेट या कंपनीतुन माल भरुन वाळुज औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी डिलिव्हरी होत असते. दोन्ही टेम्पोपैकी टाटा -407 टेम्पो (एम एच 47- वाय -3239) यावर संतोष निषाद रा. बकवालनगर
हा ड्रायव्हर म्हणुन काम करतो.

सोमवारी 14 जुलै रोजी ए. एन. एस. स्टील ट्युब लिमिटेड या कंपनीचे 3 लाख 50 हजार 647 रुपये किमतीचे व पाच वेगवेगळ्या प्रकारचे एम. एस. ट्युब पाईप वाळुज येथील यशश्री व ऋचा कंपनीत डिलीव्हरी करीता भरले होते. परंतु कंपनीत पोहोच झालेच नाही. त्यामुळे टेम्पो चालक संतोष निषाद याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे टेम्पो व चालकाचा शोध घेतला असता सदरचा टेम्पो मर्सडिज शोरुमच्या समोर मिळुन आला. परंतु त्यातील स्टील ट्यूब व पाईप लंपास केल्याचे दिसले.


याप्रकरणी राहुल आप्पासाहेब गायके (वय 31) रा. बकवालनगर म्हसोबानगर यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात टेम्पो चालक संतोष निषाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळूज पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक संतोष जगमोहन निषाद याला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला ऐवज जप्त केला. ही कारवाई वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *