वाळूजमहानगर, (ता.7) – घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरी केल्यानंतर, त्याच दुचाकी वरून महिलचे मिनी गंठण हिसकावून पसार झालेल्या दोन चोरट्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या पाच तासात जेरबंद करून दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी की, वडगाव येथील कुंदन सोपान सपकाळे (25) यांनी 1 लाख 50 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 19, क्यु-4154) सोमवारी (ता.6) रात्री 8 वाजेच्या सुमारास घरासमोर हॅण्डल लॉक करुन उभी केली होती. ती मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान लंपास केल्याचे कुंदन दिसून आले. यानंतर सपकाळे यांनी आजु-बाजुला व परिसरात दुचाकीचा शोध घेत असतांना सकाळी 6 वाजेच्या सुमारास सपकाळे यांना वडगाव-तीसगाव चौफुलीवर मार्निंग वॉकसाठी आलेल्या दोन महिला आरडा-ओरडा करतांना दिसल्या. त्यामुळे सपकाळे हे तेथे गेले असता त्यांना शिल्पा सुर्यवंशी या महिलेचे 70 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दोघा भामट्यांनी लांबविल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा शिंदे यांनी सपोनि मनोज शिंदे, उपोनि. प्रविण पाथरकर यांचे पथक पथक रवाना केले. या पथकाने परीसरातील सीसी टिव्ही फुटेज तपासणी केली. या फुटेजच्या मदतीने आरोपीच्या वर्णनाचे संशयीत दोन जण साजापूर येथे पाण्याच्या टाकीजवळ बसलेले होते. त्याचे नाव गाव विचारले असता सुमित सुभाष रुपेकर (19), दत्ता उर्फे सांभा किसन सोनगीरे (19) हे दोघे रा.साजापूर असे सांगितले. त्यांना ठाण्यात आणत चोकशी केली असता सुरवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच दुचाकी व मंगळसुत्र चोरी केल्याची कबुली दिली. तसेच करोडी शिवारात एका अज्ञात स्थळी लावलेली दुचाकी काढून दिली.
मंगळसूत्र विकण्याची तयारी –
दरम्यान मंगळसुत्र चोरल्यानंतर ते विक्रीसाठी आरोपी सुमित रुपेकर याचा मावसभाऊ विक्की बाळु सातदिवे (27) रा. देवगाव (रंगारी) ता. कन्नड याला दिले. हे चोरीचे मंगळसूत्र विक्री करण्यासाठी जात असतानाच विक्की सातदिवे यास ए एस क्लब जवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. जेरबंद केलेल्या आरोपीकडून दीड लाख रुपये किमतीची दुचाकी व 70 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण असाच 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
यांनी केले कामगिर –
ही कामगीरी पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे, दुय्यम निरिक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मनोज शिंदे, पोउनि प्रविण पाथरकर, पोह सुरेश भिसे, नितीन इनामे, समाधन पाटील, यशवंत गोबाडे, हनुमंत ठोके, विनोद नितनवरे, गणेश सागरे, योगेश शळके, राजाभाऊ कोल्हे, सुरेश कच्चे, बाळासाहेब आंधळे यांनी केली.