वाळूज महानगर, (ता.24) – चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी दुपारी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 20 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगावात शनिवारी दोन अनोळखी तरुण चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी येत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसाना मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, पोना. धिरज काबलिया, पोकॉ. यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, नितीन इनामे, सुरेश कचे, हनुमान ठोके, सुरेश भिसे यांनी शनिवारी दुपारी 3.40 वाजेच्या सुमारास रांजणगावातील दारुच्या दुकानाजवळ सापळा रचला असता दोन संशयित तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात असतांना पोलिस पथकाने त्यांना पकडले. या दोघा संशयिताकडे दुचाकीच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघा संशयितांना पोलिस ठाण्यात आणुन कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विष्णु ज्ञानेश्वर सोनवणे (21), रा.बजाजनगर) व ऋषीकेश संजय तिरके (23), रा.वाकद, जि.वाशिम, (ह.मु.बजाजनगर) असल्याचे सांगितले. या दोघा संशयिताकडे मिळून आलेल्या दुचाकीच्या चेसीस नंबरची पडताळणी केली असता या दुचाकीचा क्रमांक (एम.एच.13 डी.जी.-7958) असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. या दोघा भामट्यांच्या ताब्यातुन 1 लाख 20 हजार रुपये किमंतीची दुचाकी जप्त करण्यात आली.