
वाळूजमहानगर, (ता.13) – कोणत्याही प्रकाराला मर्यादा असतात. या मर्यादा न पाळल्या की, अतिरेक म्हणजेच कळस होतो. असाच चोरीचा कळस मुरूम माफीयांनी उत्खनन करून गाठला आहे. त्यासाठी चक्क एमआयडीसीच्या भूखंडावरील पूर्ण वाढीचे मोठमोठाले झाडे मुळासकट उपटून हरित पट्टे नामशेष केल्या जात आहे. या एमआयडीसीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाळुज परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. या अवैध धंद्यामध्ये अनेकांनी आर्थिक हात धुऊन घेत आपले उखळ पांढरे करून घेत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या के सेक्टर मधील प्लॉट क्रमांक ओ एस 42 येथे ग्रीन बेल्ट आहे. याच ग्रीन बेल्ट शेजारी ऑक्सिजन हब आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे झाडांची लागवड करण्यात आलेली असून आज घडीला ही झाडे मोठ मोठी म्हणजेच पूर्ण वाढीची झालेली आहेत. हे झाडे जगवण्यासाठी एमआयडीसीने लाखो रुपये खर्च केले आणि झाडे जगवली. त्यामुळे परिसर हिरवागार झाला परिणामी ऑक्सिजनचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.
मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज असल्याने मुरूम माफीयांनी येथे बस्तान मांडून आपले उखळ पांढरे करत आहे. या ठिकाणी वाढलेली मोठमोठाली झाडे मुळासकट जेसीबीच्या सहाय्याने उपटून निस्तनाभूत करत आहेत. व तेथील मुरूम रात्रंदिवस चोरी करत आहे. घटनास्थळी अनेक झाडे तोडलेली असून आठ ते दहा फुटाची खोल खोल खड्डे निर्माण झाले आहे. मुरूम माफीयांच्या या बे उपसा मुरूम चोरीकडे एमआयडीसीचे मात्र सोयीस्कर रित्या दुर्लक्ष होताना दिसत आहे. या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाळूज परिसरातील कामगार व नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
ऑक्सीजन हब धोक्यात –
आरोग्यासाठी ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे.
हे आपल्याला कोरोना काळात चांगलेच जाणवले. त्यामुळे अनेकांनी ऑक्सिजन प्लांट उभे केले. त्यासाठी सरकारी आणि खाजगी मदत घेतली. याचाच एक भाग म्हणून वाळुज औद्योगिक वसाहतीतील वातावरण शुद्ध राहावे व नैसर्गिकरीत्या ऑक्सिजन उपलब्ध व्हावा. म्हणून के सेक्टर मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या हस्ते ऑक्सिजन हबची निर्मिती केली. याच ऑक्सिजन हबच्या शेजारी अवैधरित्या मुरूम चोरी असून त्याची झळ या ऑक्सिजन हबला पोहोचत आहे. त्यामुळे वाळूज येथील ऑक्सिजन हब सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ –
याबाबत एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अर्जुन पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आज मी फार बिझी आहे. नंतर बोलतो. असे म्हणून त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत फोन बंद केला.
