
वाळूजमहानगर (ता.29) – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी आणलेला तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व त्याची वाहतुक करणारे 4 वाहने असा 81 लाख 44 हजार 20 रूपये किंमतीचा ऐवज सायबर व गुन्हे शाखा पोलीसांनी जप्त केला. ही कारवाई वाळूज औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता.29) रोजी करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील गट नंबर 58/पी साजापुर येथील इप्का कंपनीच्या बाजुला असलेल्या एका गोडाऊन मध्ये काही इसम हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा चोरटी विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेवून आले आहे. अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी बुधवारी (ता.29) रोजी छापा मारला असता तेथे असलेले सर्वजण पळून गेले. त्यानंतर गोडावुन व त्या ठिकाणी उभे असलेल्या वाहनांची झडती घेतली असता तेथे अवैध रित्या विक्रीसाठी महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला गुटखा मिळून आला. या मध्ये गोवा 1000 गुटखा, गोवा 1000 पान मसाला, व जी -1 जर्दा हे सर्व प्रतिबंधीत अन्न पदार्थ एकुण किंमत 41 लाख 44 हजार 20 रुपये किंमतीचा एकुण 67 मोठ्या गोण्या, तसेच अंदाजे 25 लाख रुपये किंमतीचा एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक ( के ए 56-6330), 5 लाख रुपये किंमतीची एक अशोक लेलॅन्ड कंपनीची पिकअप (एम एच 20, ईजी-6038), 5 लाख रुपये किंमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एम एच 37 व्ही- 9995), 5 लाख रुपये किंमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एम एच 14 एफ एक्स- 3832) अशी वाहने ज्या मध्ये गोवा गुटखा वाहतुकीसाठी भरून ठेवलेल्या मालासह जप्त करण्यात आली. असा एकूण चार वाहनांसह गुटखा मिळून 81 लाख 44 हजार 20 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात येऊन त्याचा पंचनामा करून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कलम 328, 188, 272, 273, 34 भादंवि सह कलम 59 अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांच्या सुचने प्रमाणे गुन्हे शाखेचे सपोनि मनोज शिंदे, सपोनि काशिनाथ मांडुळे व सायबरचे पोउपनि राहुल चव्हाण, पोअं. अमोल देशमुख, चंद्रशेखर चव्हाण, गुन्हे शाखेचे अंमलदार चंद्रकांत गवळी, विलास मुठे, विशाल पाटील, राजाराम डाकुरे, भगवान सिलोटे, तात्याराव शिनगारे यांच्या पथकाने केली.
