March 24, 2026

वाळूजमहानगर (ता.26) – काम संपल्यानंतर पायी घरी जात असलेल्या तीन कामगारांना चार जणांनी रस्त्यात अडवून त्यांच्या खिशातील रोख रकमेसह मोबाईल मिळून 23 हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून दोन किरकोळ जखमी आहेत. ही घटना वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी (ता.25) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जनार्दन दाऊ वाघमारे (29), रा. कागठी ता. बिलोली जि. नांदेड, विष्णू चोखा म्हस्के (38) रा. एकेफळ ता. भोकरदन जि. जालना हे वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथील हनुमाननगर जवळ किरायाच्या खोलीत राहतात. ते बांधकामाच्या मिक्सर मशीनवर काम करतात. शनिवारी (ता.25) रोजी रांजणगाव (शेणपुंजी) येथे स्लॅब टाकण्याचे काम संपल्यानंतर जनार्धन, विष्णू व भीमा (पूर्ण नाव माहित नाही. रा. पवननगर रांजणगाव असे तीन जण कमळापूर येथे जात असताना चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत खिशातील रोख 3 हजार रुपये व विवो कंपनीचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 23 हजार रुपयाचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. त्यांना विरोध केला असता त्यांनी लाथाबुक्क्याने तसेच चाकू व ब्लेडने मारहाण केली.

यात जनार्धन वाघमारे याच्या छाती व डाव्या हातावर चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार सुरू असताना तेथे मोठा जमाव जमला. त्यामुळे विष्णू म्हस्के यांच्या पत्नी उषाबाईला ही घटना समजतात त्या मदतीसाठी धावल्या असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. व पळून गेले. घटनेनंतर उषाबाई म्हस्के यांनी जखमी जनार्दन वाघमारे यांना रिक्षामध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना मेडिकल मेमो दिल्यानंतर घाटीत उपचारार्थ दाखल केले. याबाबत जखमी जनार्दन वाघमारे व विष्णू म्हस्के यांनी सांगितले की, हा प्राणघातक हल्ला शरीफ मुसा सय्यद उर्फ शेर्फ्या, सोहेल व आशा या संशयित आरोपींनी केला असून ते अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *