February 5, 2026

वाळूजमहानगर – घानेगाव ग्रुप ग्रामपंचायतसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी यांची 7 दिवसात नेमणूक करावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावून कार्यालय बंद करण्यात येईल. असा इशारा ग्रुप ग्रामपंचायत घाणेगावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती गंगापूर यांना दिलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत घानेगाव येथे मागील एक वर्षांपासून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहे. ग्रुप ग्रामपंचायत घानेगाव ही वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या 8 ते 10 हजारापेक्षा जास्त आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे गावात कामगार, रोजंदार, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने राहतात. तसेच 250 ते 300 लघुउद्योजक आणि 5 ते 10 मोठे उद्योग या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे. पाणी पट्टी आकारणी, कर आकारणी, कर वसुली, कर मागणी, दाखले वाटप आदी कामासाठी येथे पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे आवश्यक आहे. येथे मागील वर्षांपासून प्रभारी ग्रामसेवकाची नेमणूक आहे. प्रभारी ग्रामसेवक असल्यामुळे ते सप्ताहातून 2 दिवसच येत आहे. त्यातही 1 दिवस शासकीय सुट्टी किंवा मीटिंग आल्यास प्रभारी ग्रामसेवक कार्यालयात हजर राहत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज पूर्णपणे थांबून आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना नागरिकांच्या आरोपास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत घानेगाव कार्यालयास येत्या 7 दिवसात पूर्णवेळ ग्रामविकास अधिकार्याची नेमणूक करावी. अन्यथा 7 दिवसानंतर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावून कार्यालय बंद करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर घानेगावचे सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गायके, वंदना कृष्णा फाळके, सागर सातपुते, अनिता सुभाष बनकर, वंदना संतोष गायकवाड, कौशल्याबाई केशवराव बनकर, सुरेश गायकवाड, संजय गोंधळे, दुर्गा उत्तमप्रसाद दुबे, अनिता जगाम गायके यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *