वाळूजमहानगर, ता.20 – घरासमोर उभी केलेल्या बुलेट या महागड्या दुचाकीला अज्ञात दोन आरोपींनी आग लावून जाळली. यात जवळजवळ 50 हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना वाळूज परिसरातील साजापूर येथे सोमवारी (ता.19) रोजी भल्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गट नं 46, अष्टविनायकनगर, साजापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील कैलास भाऊराव गायकवाड (वय 43) हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एम एच 20, जी यु – 8792) ही दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे गायकवाड यांनी त्यांची बुलेट 18 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरासमोर लावली आणि झोपी गेले. रविवारी (ता.19) रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रसाद हा लघुशंकेसाठी उठुन बाहेर आला असता त्याला बुलेटला आग लागल्याची दिसली. म्हणुन त्याने जोरात ओरडुन आवाज दिला. त्यावेळी बाहेर येवुन पाहीले असता बुलेटला आगीत जळत होती. त्यामुळे गायकवाड कुटुंबियांनी तात्काळ गोधडी टाकुन, पाणी मारुन आग आटोक्यात आणली. या आगीमुळे बुलेटचे अंदाजे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी कैलास गायकवाड यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
सीसीटीव्ही चित्रण –
घटनेनंतर गायकवाड यांनी त्यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता कोणीतरी दोन अज्ञात व्यक्ती आपले अस्तित्व लपवत आले. आणि त्यांनी रॉयल इनफिल्ड बुलेटचे नुकसान करण्याच्या उद्देशाने आगपेटीने काडी ओढून आग लावली. आणि पळून गेले असल्याचे चित्रित झाले आहे.