वाळूजमहानगर, (ता.4) – घरासमोर उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करून कारच्या काचा फोडून नुकसान केले. ही संतापजनक घटना बुधवारी (ता.4) भल्या पहाटेच्या सुमारास बजाजनगरातील अयोध्यानागर श्री सिद्धेश्वर हौसिंग सोसायटीत घडली. दरम्यान हे विदूषके कृत्य परिसरात फिरणाऱ्या टुकार मुलांचे असून ते महिला व मुलींची नेहमी छेडछाड करतात असा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे.
बजाजनगरातील अयोध्यानगर परिसरात अज्ञात माथेफिरूने मंगळवारी (ता.3) मध्यरात्रीनंतर घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. अज्ञात माथेफिरूचे हे विदूषकी कृत्य असून केवळ आर्थिक नुकसान करून वाहनधारकांना त्रास देत दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. मात्र या प्रकारामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यरात्री नंतर घडलेली घटना-
मंगळवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन माथेफिरुंनी बजाजनगर अयोध्यानगर परिसरातील धुडगूस घातला. यात श्री सिद्धेश्वर सोसायटीतील आनंद देवर यांच्या घरासमोर उभ्या कारच्या (एम एच 20, बी एन. -8613) दगड फेक करून काचा फोडल्या. काच फुटल्याच्या आवाजाने सोसायटीतील गजाजन राठोड, विश्वनाथ पठाडे यांच्यासह अनेक महिला व नागरिक बाहेर आले. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी त्रस्त वाहनधारकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले.
आठवड्यातील दुसरी घटना –
आठवडाभरापूर्वीही अज्ञात माथेफिरूने असाच धुडगूस घालत सहारा हौ. सोसायटीतील तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर आजची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
