
वाळुज महानगर, (ता.4) – वाळुज येथील ग्रामीण अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी 1 जून 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2010-11 मधील माजी विद्यार्थी यांनी आयोजित केलेला स्नेह मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
तब्बल तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा डिएड च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिपाठातील विविध घटकांचा (राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना) विद्यालयाच्या प्रांगणात सुखद अनुभव घेतला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आलेले विविध अविस्मरणीय अनुभव , शिक्षकांनी दिले मौलिक संस्कार, वक्तशीरपणा, कडक शिस्त, विद्यालयीन जीवनातील आठवणी यांना आपल्या मनोगताद्वारे उजाळा दिला. शाळेतील सर्व गुरुजन वर्गाने दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीं विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनोगतावरून दिसून आले. तसेच सर्व वर्गमित्र मैत्रिणीने आपल्या विचारांची आदान-प्रदान आपल्या मनोगताद्वारे केली. तसेच यानंतर सर्वच वर्ग मित्र-मैत्रिणी आपल्या सुखदुःखामध्ये एकमेकांना समाविष्ट करून घेऊ असा दृढ संकल्प सर्वांनी या ठिकाणी केला.
विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी मुख्याध्यापक राठोड सर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रात सर्वांनी उत्तुंग भरारी घेऊन आपल्या आई-वडिलांचे गुरुजनांचे व परिणामी विद्यालयाचे अजून नावलौकिक करावे असा शुभेच्छा रुपी संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी व गुरुजन वर्गांनी स्वादिष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतला.तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा काही काळापुरते का होईना सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी दशेत असल्यासारखे जणवले. यावेळी वर्षा मानकर, दीपिका दयाळ, मंजुषा पवार, साधना सरोदे, स्वाती कोलकंटे, मंदा बनसोडे, रूपाली जाधव, पुष्पा नागरगोजे, रवी कळसाईतकर, विनोद सपकाळ, गोपाल आडवे, विलास हजारे, विशाल बामनकर, महेंद्र तुपे, ज्ञानेश्वर चव्हाण, गोपीनाथ गोंडे आदींची उपस्थिती होती.
——————-
