वाळूजमहानगर, (ता.31) – पदाधिकारी म्हटलं की शासनाला लाखो रुपयाचा चुना लावून स्वतःची पोळी भाजून घेणारा. अशी सर्वसामान्यपणे व्याख्या केली जाते. मात्र वाळूज परिसरातील वळदगाव ग्रामपंचायतच्या एका पदाधिकाऱ्यानी स्वतःच्या शेतातील पिकांची पर्वा- तमा न करता गावाला मोफत पाणी पुरवून गावकऱ्यांची तहान भागवली. विशेष म्हणजे शासनाच्या लाखो रुपयाची बचत केली.
पाणी पातळी खोलवर गेल्याने सर्वत्र भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाळूज परिसरातील वळदगाव येथेही पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र वळदगावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय त्रिंबकराव झळके यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी विनामूल्य गावातील जनतेस पुरविले. विशेष म्हणजे त्यांनी शेतातील उभ्या पिकाची पर्वा केली नाही. झळके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून गावासाठी पाणी दिल्याने ग्रामपंचायतला सुद्धा पाणीटंचाईच्या काळात वळदगाव येथील जनतेस सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करता आला. झळके यांनी पाणी दिल्यामुळे शासनाचे पाण्याच्या टँकर करीता होणारा दोन ते तीन लाख रुपये खर्च वाचला.
ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार –
झळके यांनी गावाला केलेल्या या सहकार्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथील मासिक सभेत ठराव घेऊन संजय झळके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अमरसिंग डांगर, उपसरपंच विष्णू झळके, ग्रामविकास अधिकारी बळीराम राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, अशोक खोतकर, मणेश शिंदे, विनोद खोतकर, रितेश पहाडीये यांनी तसेच उपस्थित गावकर्यानी त्यांचे आभार मानले.