
वाळूजमहानगर, (ता.16) – हिंदू राष्ट्र स्थापना आंदोलनाला गती मिळावी, ‘कश्मीर फाइल्स’ प्रमाणे गोवा फाइल्स’वरही चर्चा व्हावी. यासाठी गोव्यात आज शुक्रवारी (ता.16) पासून ते 22 जूनपर्यंत ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. गोवा येथे आयोजित धर्म अधिवेशनास जगभरातील विविध देशांतील प्रतिनिधी व भारतातील सर्व राज्यांतील हिंदू संघटनांचा सहभाग असणाऱ्या या वैश्विक हिंदुराष्ट्र महोत्सवसाठी छत्रपती संभाजीनगर (वाळूज परिसरातील तुर्काबाद) येथील राष्ट्रीय धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे रवाना झाले आहेत. 
गोव्यातील रामनाथ देवस्थान, फोंडा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी हे उपस्थित होते. यावेळी रमेश शिंदे म्हणाले की, काश्मीरमध्ये हिंदूवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी दहशतवादासाठी वापर करण्याचे षडयंत्र मांडण्यात आले. गोव्यातही पोर्तुगीजांनी ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे. गोव्याचा खरा इतिहास समजून घेणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.
या ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’ला अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 128 राज्यांतील 350 हून अधिक हिंदू संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे.
या अधिवेशनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, काशी ज्ञानवापी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णू शंकर जैन, तेलंगणा येथील हिंदुत्त्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदू इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे संपर्कप्रमुख धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे, “भारत माता की जय’ संघटनेचे सुभाष वेलिंगकर यांच्यासह अनेक उद्योजक, विचारवंत, लेखक उपस्थित राहाणार असल्याचेही राष्ट्रीय धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे यांनी सांगितले.
