
वाळूजमहानगर, (ता.19) – अभिषेक, वाहन रॅली, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, सर्व रोग निदान शिबिर, तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व पोवाडा स्पर्धा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजित करून गुलाल, फुलांची उधळण व जय भवानी, जय शिवाजी. असा गजर करत बजाजनगर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांची 394 वी जयंती सोमवारी (ता.19) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठे शिवस्मारक बजाजनगर येथे आहे. येथे समस्त शिवभक्त परिवाराच्या वतीने शिवजयंती निमित्ताने सकाळी 9 वाजता वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, उद्योजक कैलास भोकरे, अर्जुन आदमाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश शेळके, नंदकुमार साळुंखे, अतुल पेरे, विजय सरकटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवजन्माचा पाळणा व सामुदायिक महाआरती घेण्यात आली. सकाळी 10 ते 11 विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. 11 ते 3 दरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत लहान मुलांसाठी भाषण व पोवाडा स्पर्धा पार पडल्या. सायंकाळी 6 वाजता शिवपुत्र प्रतिष्ठान ढोल पथकाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. रात्री 7.30 नंतर साऊंड सिस्टिम आणि लाईट शो च्या प्रकाशामध्ये संपूर्ण शिवस्मारक उजाळून निघाले होते. शिवभक्तांच्या सेवेसाठी समस्त शिवभक्त परिवार शिवस्मारक समितिच्या सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
गुलाल फुलांची उधळण –
यावेळी शिवप्रतिमेवर गुलाल फुलांची उधळण व छत्रपती शिवाजी महाराजांचा गजराने संपूर्ण वाळूज महानगर परिसर शिवमय झाला होता. रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
रायगड किल्ल्याची प्रतिकृती –
शिवजयंती निमित्त रविवारी रात्री 12 वाजेपासूनच बजाजनगरातील शिवस्मारक परिसर हजारो शिवभक्तांनी फुलून गेला होता. शिवस्मारक परिसरात समस्त शिवभक्त परिवाराने मुख्य प्रवेशद्वारावर रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारली. या प्रवेशद्वारातून छत्रपती शिवरायांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी जाताना शिवभक्तांना किल्ले रायगडावर आल्याचा भास होत होता. 
माझ्या राजाची जयंती गीतावर थिरकली –
रॅलीमध्ये “माझ्या राजाची जयंती आली” या गीतावर अक्षरश: तरुणाई व ज्येष्ठ नागरिक जल्लोषपूर्ण वातावरणात थीरकले. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय घोषाने संपूर्ण वाळूजमहानगर परिसर दणाणला होता. रात्री उशिरापर्यंत शिवस्मारकावर शिवभक्तांनी आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
वाहन रॅलीने दुमदुमला परिसर
शिवजयंती निमित्ताने संपूर्ण वाळूजमहानगर परिसर भगवे ध्वज मय झाला होता. तसेच शिवजयंतीचे अवचित्य साधून शिवप्रेमींच्या वतीने दुचाकी, चारचाकी रॅली, रिक्षा रॅली, व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आल्या होत्या. दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण वाळूज महानगर दुमदुमून गेला होता.
