वाळूजमहानगर, ता.4 – चिलम तसेच सिगारेटमध्ये भरून मोकळ्या जागेत गांजा पिताना चार जणांना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी रंगीहात पकडले. ही कारवाई रविवारी (ता.2) रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजे दरम्यान सिडको वाळूज महानगर -1 येथे करण्यात आली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, पोलीस अंमलदार समाधान पाटील, हनुमान ठोके हे गस्त घालत असताना त्यांना सिडको वाळूज महानगर येथील जुन्या बस स्टॉपजवळ सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अमन संजय गिरी (वय 20) रा. अयोध्यानगर, बजाजनगर हा सिगारेट मध्ये गांजा टाकून पिताना मिळून आला. त्यानंतर 5.30 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगर -1 येथील वाळूज हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मयूर रावसाहेब अधिक (वय 20) रा. आर एच 15 बजाजनगर हा चिलम मध्ये गांजा पिताना मिळून आला. तसेच सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगर -1 येथीलच पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेवर विशाल गंगाधर गव्हाड वय 20 वर्ष रा. सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ बजाजनगर सिगारेट मध्ये गांजा भरून पिताना मिळून आला. याशिवाय साडेसात वाजेच्या सुमारास सिडको गार्डनजवळ चिन्मय अजय जाधव (वय 26) रा. वडगाव (को.) गट नंबर 5 चिलम मध्ये गांजा भरून पिताना 7.30 वाजेच्या सुमारास मिळून आला. या सर्व आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.