वाळुज महानगर (ता.6) – जगाची घडी धार्मिकतेवर आधारित आहे. आणि हीच घडी भविष्यातही टिकून राहावी. म्हणून गंगापूर तालुक्यातील हभप मंडळींनी अनोखा उपक्रम राबवत प्रत्येक एकादशीला वेगळ्या गावात जाऊन भजन कीर्तनातून धार्मिक जनजागृती बरोबरच बालसंस्कार, व्यसनमुक्ती, समरसता, गोसेवा, वृक्षारोपण, भ्रूणहत्या. अशा अनेक सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करत आहे. या अनोख्या उपक्रमाचा विस्तार जिल्ह्यात व राज्यात करण्याचा सुद्धा हभप मंडळींचा मानस आहे.

ग्रामविकासाची संजीवनी बुटी असलेल्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र |
सज्जनांनी व्हावे एकत्र |
संघटना हेचि शक्तीचे सूत्र |
हे ग्रामोन्नतीचे सूत्र विषद केले आहे. थोर साधू संत व महात्म्यांचा विचार गाव खेड्यात पोहचवून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, गावातील युवापिढी व विद्यार्थी सुसंस्कारीत व्हावे. या उदात्त हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ‘जागर भक्तीचा’ हे ग्रामस्थांशी सुसंवाद साधत भक्ती मार्गाचा अवलंब करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक एकादशीला गंगापूर तालुक्यातील संत, महंत, किर्तन, प्रवचनकार भागवताचार्य ही मंडळी स्वखर्चाने प्रत्येक एकादशीला एका गावात जाऊन ग्रामस्थांशी सुसंवाद साधून टाळ, मृदंगाच्या गजरात ईश्वर भक्तीचा जागर करत आहेत. तसेच ग्रामस्वच्छतेचा संदेश पोहचवून ग्रामविकासाला चालना देत आहेत.
या अभियानाचा शुभारंभ तुर्काबाद (खराडी) परिसरातील भाविकांच्या संकल्पनेतून 24 एप्रिल 2025 रोजी वरुथिनी एकादशीच्या पवित्र दिनी लखमापूरवाडी येथे करण्यात आला. त्यानंतर 8 मे रोजी मोहिनी एकादशी निमित्त वाळूज महानगरातील लिंबेजळगाव जवळच्या रामनगर, अब्दुलपूर, अपरा एकादशी निमित्त 23 मे रोजी इसारवाडी फाट्या जवळील कदीम शहापूर, 7 जून रोजी भागवत एकादशी निमित्त सिद्धनाथ वाडगाव जवळच्या वडाळी येथे व 22 जून रोजी दहेगाव बंगल्या येथील सारंगपूर व आज सहा जुलै रोजी तुर्काबाद खराडी जवळील शिरोडी या गावी हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रत्येक पंधरवाडी एकादशीच्या चार, पाच दिवस अगोदर ही मंडळी गंगापूर तालुक्यातील एखाद्या नवीन गावाची निवड करतात. त्यानंतर एकादशीच्या दिवशी त्या गावात सकाळीच स्वखर्चाने ही संत, महंत मंडळी भजनी मंडळीसह पोहचतात. गावकरीही गावात सडा मार्जन, रस्त्यांच्या कडेला व घरासमोर रांगोळ्या काढून प्रसन्न वातावरण निर्माण करतात. ही मंडळी व गावकरी गावातून टाळ, मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा घालत मारुतीच्या पारावर किंवा गावातील सार्वजनिक स्थळी विसावतात. त्यानंतर ही संत महंत मंडळी माऊलींची ज्ञानेश्वरी, जगतगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा, संत एकनाथ महाराज आणि थोर संत महापुरुषांच्या मानव कल्याणकारी विचारांचा जागर करत ग्रामस्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देतात. कुटुंब प्रबोधन, मातृशक्ती जागर, दुर्व्यसन मुक्ती, बालसुसंस्कार, गोसेवा, वृक्षारोपण व संवर्धन, सण, उत्सव, सामाजिक समरसता व ग्रामोन्नती आदी विषयावर ही मंडळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे या कार्यक्रमात ही मंडळी कोणताही सत्कार किंवा हार तुरे, मानधन स्वीकारत नाही.
या उपक्रमात गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद (खराडी) येथील धर्माचार्य डॉ.जनार्दन मेटे महाराज, लखमापूर येथील रामकृष्ण भक्तीधामचे प.पू.योगीराज दादा महाराज वायसळ, गणेशवाडी येथील रामगड संस्थांचे प.पू.बाळकृष्ण महाराज दिघे, शिरेसायगाव येथील गोशाळेचे प.पू.विष्णुपंत महाराज नेमाने, बजाजनगर येथील प.पू.बबन महाराज चौरे, धानोरा येथील भागवताचार्य पंढरीनाथ महाराज जंजाळे, नागापूर येथील श्री दत्त गुरुकुलचे भागवताचार्य किशोर महाराज निकम शास्त्री, जिकठाण येथील ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्थेचे भागवताचार्य कृष्णा महाराज भवर, गाजगाव येथील भागवताचार्य राम महाराज व्यवहारे शास्त्री, लिंबे जळगाव येथील सप्तशृंगी माता आश्रमाचे प.पू.विजय महाराज खेडकर, मुरमी येथील श्री दत्त संस्थानचे स्वामी प्रेमदासजी महाराज, नायगाव येथील भागवताचार्य विशाल महाराज जाधव, शेकटा येथील भागवताचार्य शामाकांत महाराज भवर, प.पू.अमोल महाराज भवर, शिंदेवाडी येथील जय हनुमान वारकरी शिक्षण संस्थेचे पपू.प्रवीण महाराज जाधव, शिवराई येथील रामायणाचार्य संजय महाराज कुऱ्हाडे, शिल्लेगाव येथील प.पू.कडुबाळ महाराज गवांदे, लासुर स्टेशन येथील प.पू.ज्ञानेश्वर महाराज लोखंडे, प.पू.पंढरीनाथ महाराज म्हैसमाळे, डोमेगाव येथील भागवताचार्य किशोर महाराज भाटवडे, राजुरा येथील प.पू.वाल्मीक महाराज शास्त्री, प.पू.ज्ञानेश्वर महाराज गोरे, बकवालनगर येथील भागवताचार्य प्रदीप महाराज धनक, प.पू.तोगे महाराज, प.पू.नवनाथ महाराज भवर, बजाजनगर प.पू.भागवत महाराज गरड, सावखेडा येथील प.पू.कृष्णा महाराज मुळे, बगडी येथील प.पू.संजय महाराज निथळे, लिंबे जळगाव येथील श्री सप्तशृंगी माता वारकरी शिक्षण संस्थेचे प.पू.ज्ञानेश्वर महाराज शेजुळ आदी सहभागी होत आहेत.

अभियानाचा विस्तार –
या अभियानाबाबत तुर्काबाद (खराडी) येथील धर्माचार्य डॉ.जनार्दन मेटे महाराज दैनिक पुण्यनगरीशी बोलताना म्हणाले की, वारकरी संप्रदायातील महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज सकल संतांची समाजाविषयी असलेली तळमळ
‘लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम’,
अर्थात संतांनी जगाच्या घरोघर जाऊन विनंती केली, हात जोडले, पाया पडले. या अनुषंगाने आपणही वारकरी संप्रदायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रत्येक एकादशीला नवीन गाव खेड्यात जाऊन कुटुंब प्रबोधन, बालसंस्कार, व्यसनमुक्ती, समरसता, गोसेवा, वृक्षारोपण, भ्रूणहत्या. अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करावं. असा निर्णय सकलसंताच्या संमतीने घेतला असून हा उपक्रम भाविकांच्या सहकार्याने जिल्हा, व राज्य स्तरापर्यंत जावा. अशी तळमळ आहे.
