
वाळुज महानगर, (ता.30) – मुलीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याचा राग मनात धरून दोघांच्या अंगावर बोलेरो जीप घालून चाकाखाली चिरडून एकाचा खून करून व दुसऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या आरोपींच्या पोलिसांनी शनिवारी (ता.30) रोजी मुस्क्या आवडल्या. घटनेनंतर अवघ्या काही तासातच ही कामगिरी केल्याने वाळूज पोलिसांची निश्चितच मान उंचावली आहे. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (ता.28) मार्च रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास शेंदुरवादा ते सावखेडा रोडने दुचाकी दुचाकी(एम एच 20, जी यु -4944) वरुन जाणाऱ्या शिवराम एकनाथ मोढे (वय 46) व पवन शिवराम मोढे (वय 25) रा. ओझर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या पिता-पुत्रांना महिंद्रा बोलेरो जीप (एम एच 20, ई वाय -0645) गाडीने पाठीमागुन जोराची धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडल्यावर बोलेरो जीप पुन्हा वळवुन आणुन दोघांच्या अंगावर घालुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात पवन शिवराम मोढे या युवकाच्या डोक्यावरुन जीपचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान जीप रोडच्या खाली जावुन पलटी झाली. त्यानंतर आरोपी गाडी सोडुन पळुन गेले.
जीपमध्ये सापडले आधार कार्ड –
प्रथम दर्शनी अपघात वाटणाऱ्या या घटनेची फिर्याद मिळताच घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ वाळूज पोलिसांनी परिसरात झाडाझडती घेतली. दरम्यान आरोपींनी घटनास्थळी सोडून दिलेल्या बोलेरो जीप मध्ये एक पाकीट मिळाले. या पाकिटामधील आधारकार्डवरुन आरोपीची ओळख पटली.
घटनेचे कारण असे–
या घटनेतील जखमी शिवराम मोढे यांचा भाचा नवले हा कामधंद्यासाठी त्यांचेकडेच राहतो. त्याने आरोपी रुपचंद लक्ष्मण वाघचौरे (वय 44) याच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. ते दोघे पळुन गेले होते. त्यावेळी मुलगी परत आल्यानंतर ती वडिलांकडे न जाता शिवराम यांच्याकडे आली होती. त्यामुळे शिवराम हा भाच्याला पाठिंबा देतो व त्यामुळेच त्याने आपल्या मुलीस पळुन नेले. म्हणुन शिवरामवर रुपचंद याचा राग होता. त्यातुनच आरोपी रूपचंद याने नियोजनबध्द रितीने त्यांचा मुलगा विशाल रूपचंद वाकचौरे वय 21, पुतण्या सचिन भागचंद वाकचौरे वय 27, (तिन्ही रा.धुपखेडा ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर), राम विठ्ठल सोलट वय 24, रा. शेंदुरवादा व मेहुणा संदीप आबासाहेब बर्डे रा. सावखेडा यांनी संगणमत करून, पाळत ठेवुन शिवराम व पवन यांचा पाठलाग करुन त्यांना महिंद्रा बोलेरो जीपगाडीने धडक देऊन टाकाखाली चिरडले. त्यामध्ये पवन याचा जागीच मृत्यु झाला. तर शिवराम जखमी झाला. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 302, 307, 120 (ब), 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. या घटनेतील सर्व 5 आरोपींच्या वेगवेगळया ठिकाणावरुन मुस्क्या आवडल्या. घटनेनंतर अवघ्या काही तासाच्या आत ही कामगिरी केल्याने वाळूज पोलीस निश्चितच बक्षीस पात्र ठरले.
यांनी केली कारवाई –
पोलस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सखाराम दिलवाले, अजय शितोळे, रमेश राठोड, पोलीस हवालदार संदिप धनेधर, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, गजानन सपकाळ, नितीन धुळे, सुखदेव कोल्हे, गणेश लक्कस यांनी ही कामगिरी केली.
