वाळूजमहानगर, ता.27 – एका कुटुंबातील शेतीची वाटणी करून देण्याच्या वादात चाकूने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 12 ऑक्टोंबर रोजी घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या पाच आरोपींच्या वाळुज एमआयडीसी पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या.
या प्रकरणात एजाज ऊर्फ चिवा ठकसेन काळे (३५) रा. लक्ष्मी गायरान, वाळूज ता. गंगापूर याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे सर्व आरोपी घटना घडल्या पासून होणार होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे आरोपींचा कसून शोध घेत होते. या फरार आरोपीबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की यातील सचिन ठकसेन काळे, सुवर्णा ऊर्फ सफेरा सचिन काळे व अमोल सचिन काळे रा. पत्रा कॉलनी, वाळूज हे केंब्रिज चौकातील सुंदरवाडी परिसरात लपलेले आहेत. माहितीच्या आधारे शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील रेल्वे पटरीजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरात आरोपींचा शोध घेत असताना यातील आरोपी सचिन काळे हा पोलीस आल्याची माहिती मिळताच पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पाठलाग करत पकडले. तसेच अमोल काळे हा देखील अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या. सुवर्णा ऊर्फ सफेरा ही देखील याच परिसरात पोलिसांना मिळून आली. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई गोष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, श्रीकांत सपकाळ, नितीन धुळे, महीला शिपाई सुनिता त्रिभुवन यांनी केली.