February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.14) – भरधाव जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस आणि मालवाहू आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यातील एक मुलगी गंभीर जखमी आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात वाळूजजवळ रविवारी 14 डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याकडून नागपूरकडे जाणारा आयशर ट्रक (एम एच 40, बी एल -0858) हा वाळूज जवळील शिवराई गावासमोरील स्पीड ब्रेकरवर स्लो झाला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणारी व पुण्यावरून छत्रपती संभाजीनगर मार्गे नागपूरला जाणारी इंटरसिटी स्मार्ट ही खाजगी बस (ए आर 01, वाय -7878) आयशर ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. रविवारी 14 डिसेंबर रोजी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात इंटरसिटी ही खाजगी बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बस मध्ये 34 प्रवासी होते. अचानक मोठा आवाज होऊन बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी घाबरले. या अपघातात 12 ते 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यातील अनुष्का गव्हाणे ही सोळा वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातातील किरकोळ जखमी प्रवाशांवर घटनास्थळीच प्रथमोपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी तरुणीला 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. विशेष म्हणजे या अपघातात खाजगी बसच्या समोरील, पाठीमागील व दोन्ही बाजू अशा चारही बाजूचे मोठे तसेच मालवाहू आयशर ट्रकचे त्याचप्रमाणे त्यातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, अंमलदार भीमराव शेळके, विलास जाधव, महेश पाटील, सचिन राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच इंटरसिटी ही खाजगी बसचा चालक हंसराज भाटिया रा. देवली, जि. बिलासपुर (हिमाचल प्रदेश) याला ताब्यात घेतले. दरम्यान या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 16 वर्षीय तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे वाळुज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

जखमीमध्ये दोन्ही चालकांचा समावेश –
इंटरसिटी या खाजगी बसमध्ये 34 प्रवाशांसह हंसराज भाटिया (वय 43) रा. देवली, जि. बिलासपुर (हिमाचल प्रदेश), नारायण पांडुरंग जाधव (वय 45) रा. पुणे हे दोन बसचालक व क्लीनर रोशन सुरेंद्र तायडे (वय 28) रा. अंजनगाव सुर्जी अमरावती होते. अपघातानंतर क्लीनर रोशन तायडे हा बाहेर फेकला गेला. तर भाटिया व जाधव हे दोन्ही चालक बसमध्येच अडकून किरकोळ जखमी झाले. त्यातील एकाच्या तोंडाला तर दुसऱ्याच्या पायाला मार लागला आहे.

अतिवेगाचा परिणाम –
या अपघातातील अपघातग्रस्त बस व आयशर ट्रकच्या झालेल्या नुकसानीवरून अपघाताची भीषणता दिसून येते. वाहतुकीचे न पाळलेले नियम व अतिवेगाचा हा परिणाम आहे. अशी चर्चा प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्यामधून ऐकावयास मिळाली.

वेगावर नियंत्रणाची गरज –
छत्रपती संभाजीनगर येथून सर्वाधिक खाजगी बस अहिल्यानगर मार्गे पुण्याला जातात आणि येतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बसेस रात्रंदिवस धावतात. छत्रपती संभाजीनगर पुणे दरम्यान रेल्वे सेवा नसल्याने या खाजगी बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रवाशांचा सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या खाजगी बसेस अत्यंत वेगात धावतात. विशेषतः रात्री तर अतिवेगात असतात. त्यामुळे भीषण अपघाता सारख्या दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्यात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अपंगत्व येते. त्यामुळे या खाजगी बसच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून संबंधित विभागाने या अतिवेगात धावणाऱ्या खाजगी बसवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *