वाळूजमहानगर, ता.12 – शासनाची परवांगी न घेता बेकायदेशीर रित्या रासायनिक खते व किटकनाशकांची साठवणुक केल्याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन जवळजवळ पावणे दोन कोटीचा मुद्देमाल गोडाऊन मध्ये शीलबंद करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 10) रोजी करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मातोश्री ऍग्रो ट्रेडर्स येथील गोडावून मध्ये खत व किटकनाशकाची बेकायदशीर रित्या
साठवणुक केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाला मिळाताच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हरीभाऊ कातोरे, अधिकक्ष कृषि अधिकारी जी डी मोरे, दक्षता पथकाचे उपसंचालक किरण जाधव, तंत्र अधिकारी नरेंद्र बारापत्रे, गुलाब कडलग, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, तंत्र अधिकारी अशिष काळुशे, गुुणवत्ता नियंत्रक एस जी बंडगर, पंकज ताजने, दिनकर जाधव यांच्या पथकाने वाळूज औद्योगिक परिसरातील ओमोरॉन एंटरप्रायझेस सी 205 येथील मातोश्री ऍग्रो ट्रेडर्सच्या गोडावुनची तपासणी केली. त्यावेळी जास्तीचा माल आढळून आला. त्याबाबत ट्रेडर्सचे मालक दानिश अग्रवालकडे विचारणा केली असता त्यांनी परवांगी नसल्याचे सांगितल्याने गोडाऊन मधील 1 कोटी 6 लाख 87 हजार 187 रुपये किमतीचे खत व 61 लाख 25 हजार 718 रुपये किमतीचे किटकनाशक. असा एकुण 1 कोटी 68 लाख 12 हजार 905 रुपये किमतीचा मुद्देमालसह गोडावुन सिल करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हरीभाऊ कातोरे यांच्या फिर्यादीवरून दानिश अग्रवाल याच्या विरुद्ध खत नियत्रंण आदेश व किटकनाशन निमयाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. मनोज शिंदे करीत आहे.