वाळूज महानगर – आसेगाव ते लासुर स्टेशन या खड्डेमय रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून आणखी एक अपघात झाल्याचे रविवारी (ता.25) रोजी सकाळी उघडकीस आले. या अपघाताचे चित्रण सीसीटीव्हीत आले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
वाळुज औद्योगिक परिसरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई या एक्सप्रेस हायवेवर खड्डे पडून अक्षरश: चाळणी झाली आहे. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित आमदार, खासदारांसह शासकीय यंत्रणाही उदासीन असल्याने या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहेत. अंदाजे 22 ते 23 किलोमीटर असलेल्या आसेगाव फाटा ते लासुर स्टेशन या दरम्यान दररोज लहान मोठे अपघात होतात. त्यात अनेकांना जीव गमावावा लागला.शिवाय अनेकांना अपंगत्वही आले आहेत. मात्र त्याचे संबंधितांना काहीही सोईरसुतक नसल्याचे दिसून येते. याच रस्त्यावरील आसेगाव फाटा येथे शनिवारी रात्री खड्डे वाचवताना कार एम एच 20, ईजे-8911) च्या चालकाचा ताबा सुटला व अपघात झाला. ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात आली असल्याचे रविवारी (ता.25) समोर आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.