
वाळूजमहानगर, (ता.23) – सिडको वाळूज महानगर परिसरात गतीरोधकाअभावी सतत होणाऱ्या अपघाताबाबत सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीने पाठपुरावा केल्याने सिडको प्रशासनाच्या वतीने दखल घेऊन गतिरोधक, रब्लिंगस्ट्रिप, रिफ्लेक्टर टाकण्याच्या कामास सुरुवात केली. या कामामुळे येथील अपघातास आळा बसणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सिडको वाळुजमहानगर परिसरातील सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहन भरधाव जाऊन मुख्य चौकात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत होती. याबाबत रहिवाशांकडून सतत तक्रारी पाहुन सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, काकासाहेब बुट्टे, सुदाम जाधव, गणेश बिरंगळ, प्रविण हाडे, सुरेश कनसे, शितल गंगवाल, कमल सुर्यवंशी, गजानन गार्डे, मच्छिंद्र कुंभार, तेजस बढे, काकासाहेब गाढे, अंबादास गुंजाळ, अंकुश लेंडाळे, पंडित शिंदे, कल्पेश शिरसाट, भुपेंद्र परिहार यांच्या पाठपुराव्या अंती सिडकोकडून तिसगाव ते वडगाव रोडवर गगन लाॅन्स समोरील चौकात गतिरोधक, रब्लिंगस्ट्रिप, रिफ्लेक्टर टाकण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली. यामुळे येथील अपघाताला आळा बसणार असल्याने सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
