वाळूज महानगर – कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. या सुमधुर गाण्या प्रमाणेच वाळूज परिसरातील वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतचे सांडपाणी तसेच ड्रेनेजचे पाणी तिसगाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील जिजामातानगरात सोडल्या जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी या पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करा, नसता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यातील येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील नागरिकांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. त्यामुळे गावाचा विस्तार होऊन अनेक नागरी वसाहती उदयास आल्या. त्यातील गट नंबर 141 मधील जिजामातानगर ही एक वसाहत आहे.
तिसगाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या नागरी वसाहतीत वडगाव (को.) – बजाजनगर ग्रामपंचायतच्या ड्रेनेज तसेच सांडपाणी जिजामातानगर येथे सोडल्या जात असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे जिजामातानगर गट नंबर 141 मध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असून डास व मच्छरांचाही मोठा त्रास होत आहे. परिणामी येथील लहान मुले, कामगार व वरिष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे जिजामातानगर येथील दोन ते अडीचशे नागरिकांनी तिसगाव ग्रामपंचायतकडे धाव घेत निवेदन दिले. तिसगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांना दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचा तात्काळ बंदोबस्त करा.
नसता ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर नामदेव बाबर, कालिदास शिंदे, अरुण मिसाळ, मोहन सातपुते, संदीप दाणे, बाळासाहेब पवार, सचिन अंभोरे,निळकंठ काळवणे, दिलीप राजपूत, अनील देवरे, राहुल पाटील, नितीन शिंदे, किशोर काळुसे, अंबादास टाकळकर, अजमेरा नदाब, वनिता दाणे, दिपाली शिंदे, फरीदा शेख, शकीला शेख, उषा टाकळकर, पूजा मिसाळ, समीना नदाब, उषा बाबर, छाया शिनगारे, जया गुजर, वनिता काळुसे, मीरा वाघ, निर्मला राजगुरू, भारतबाई शिंदे, हिराबाई भंडे, मेघा गायकवाड, रहीम शेख, सोपान शिंदे, विठ्ठल चोपडे, योगेश भगत, पांडुरंग वाघ, संतोष गायकवाड, करण गुजर आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.
बिल्डरने सुविधा दिल्या नाही –
याबाबत वडगाव (को.)-बजाजनगर ग्रामपंचायतचे प्रशासक दीपक बागुल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वडगाव हद्दीमधील गट नंबर 12 मध्ये बिल्डरने प्लॉटिंग केली, रो हाऊस बांधले. मात्र तेथील नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा दिल्या नाही. त्यामुळे त्या वसाहतीतील दुर्गंधीयुक्त पाणी तिसगाव ग्रामपंचायतच्या जिजामातानगरात जाते. या बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आम्ही त्याला नोटीस बजावणार आहोत.