वाळूजमहानगर, ता.29 – भरधाव जाणाऱ्या एका ईरटीका कारने स्कुटी या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीवरील एक महिला ठार झाली. तर एका महिलेसह दोन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.28) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास वडगाव ते तिसगाव रोड वरील नायरा पेट्रोल पंपासमोर झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ईरटीका कार (एम एच 12, एस एल -4502) ही तिसगाव चौफुली कडून वडगाव कोल्हाटीकडे जात होती. तर सुभाष सयाजी सुरवसे (वय 45) व त्याची पत्नी सुरेखा सुभाष सुरवसे (वय 40) तसेच त्यांच्या शेजारी राहणारी आशामती राजाभाऊ घुले (वय 46) हे एकाच कंपनीत काम करणारे तिघेजण स्कुटी (एम एच 20, जीवाय -28 58) वरून
वैष्णोमाता मंदिराकडून गट नंबर 6 कडे जात असताना तिसगाव वडगाव रोडवरील नायरा पेट्रोलपंपा समोरून वळण घेत असताना या दोन्ही वाहनांचा शनिवारी (ता.28) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अपघात झाला.
या अपघातात स्कुटीवरील तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टर आणि तपासून आशामती राजाभाऊ घुले (वय 46) रा. रामगल्ली आष्टी, ता. परतुर जि. जालना या महिलेस मयत घोषित केले. तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ईरटीका कार चालकास ताब्यात घेण्यात आली आहे.