
वाळूजमहानगर, (ता.1) – एका 28 वर्षीय तरुणाचा प्रेस शॉप मध्ये अपघात होऊन मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.31) रोजी वाळुज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील गणेश प्रेस मध्ये घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील फुलेनगरात राहणारा कमलेश बाबुराव राठोड (वय 28) हा वाळुज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील एम 152, गणेश प्रेस शॉप मध्ये काम करत होता. रविवारी (ता.31) रोजी कंपनीत काम करता असतांना दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास कंपनीच्या पत्र्यावर गेला. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध झाला. ताहेर पठाण, अनिल भालेराव यांनी त्यास उपचारार्थ घाटीत दाखल केले असता कमलेश यास तपासुन डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश मनोरे करीत आहे.
