March 24, 2026


वाळुज महानगर (ता.29) :- कामगार दिन (1 मे) चे औचित्य साधून वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात असलेल्या कामगार पुतळ्याची घासून पुसून स्वच्छता करत सुशोभीकरण व रंगरंगोटी करण्याचे काम शनिवारी (ता.29) रोजी सकाळी सुरू करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या वतीने करण्यात येत असलेल्या या कामामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेनंतर पंढरपूर येथील छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील कामगार चौकात कामगाराचे प्रतिक म्हणून कष्टकरी कामगार म्हणून पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली आहे. 1 मे हा कामगार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या निमित्त कामगार चौकातील या कामगार पुतळ्यास विविध कामगार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात येते. त्यातून कामगारांना काम करण्याची स्फूर्ती मिळते.

मात्र हा कामगार पुतळा अत्यंत रहदारीच्या चौकात असल्याने या पुतळ्याची नेहमी दुरवस्था होत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी या पुतळ्याची स्वच्छता, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येते. कामगार दिन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने या पुतळ्याची रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्यात यावे. यासाठी वाळूज औद्योगिक वसाहतीतील न्यू पॅंथर कामगार सेनेच्या वतीने शुक्रवारी (ता.28) रोजी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

या निवेदनाची तात्काळ दखल घेत एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार पुतळ्याची घासून पुसून स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामावर एमआयडीसीचे तांत्रिक सहाय्यक दिलीप चौथ लक्ष ठेवून आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *