वाळुज महानगर (ता.27)- कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण व कामाचा अनुभव नसताना व सुरक्षेची काळजी न घेता काम करण्यास भाग पाडल्याने अपघात होऊन कामगाराचा अंगठा निकामी झाला. 24 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या या अपघाताप्रकरणी कंपनीचे मॅनेजर ठेकेदार व सुपरवायझर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज येथील रामराई फाट्यावर असलेल्या सिमेंस कंपनीच्या वेअर हाऊसचे कंपनीचे मॅनेजर रवि दंडे, सुपरवायझर राहुल पाचपुते व ठेकेदार अतुल खुळे यांनी रघुनाथ सुखदेव आढव, (वय 58) रा. लांझी कृष्ण मंदीर जवळ ता. गंगापुर जि. छ. संभाजीनगर यांना कंपनीमध्ये तांत्रिक शिक्षण नसताना व काम करण्याचा अनुभव नसताना रघुनाथ आढाव यांना काम करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे सुरक्षेची काळजी घेतली नाही व धोकादायक वातावरणात रघुनाथ याच्याकडुन मजुरी करुन घेत असताना अपघात झाल्याने उजव्या हाताचा अंगठा तुटुन गंभीर दुखापत झाली. व बोट कायमस्वरुपी निकामी झाले. हा अपघात सिमेंस कंपनीच्या वेअर हाऊस मध्ये 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी रघुनाथ आढाव यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी सिमेंस कंपनीच्या वेअर हाऊसचे मॅनेजर रवि दंडे, सुपरवायझर राहुल पाचपुते, ठेकेदार अतुल खुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गफ्फार शेख करीत आहे.
