वाळूज महानगर, (ता.28) – संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आमरण उपोषण चालू केले. आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने छत्रपती संभाजीनगर तालुका काँग्रेस कमिटीचे (पश्चिम) तालुकाध्यक्ष सर्जेराव विश्वनाथ पाटील चव्हाण रा. करोडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याकडे शनिवारी (ता.28) रोजी दिला.
या राजीनाम्यात सर्जेराव चव्हाण यांनी म्हटले आहे की, मी छत्रपती संभाजीनगर पश्चिम काँग्रेस पक्षाच्या ‘तालुका अध्यक्ष’ या पदावर काम करीत होतो. परंतु मागील काही दिवसांपासून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आमरण उपोषण चालू केले. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या असून समाजातील तरुण पिढी उदिग्न झालेली आहे. त्यामुळे आता मोठया प्रमाणात मराठा आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण मराठा समाज बांधव एकजुटलेला आहे. तसेच मराठा समाजा व्यतिरिक्त दुस-या समाजातील समाज बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना सत्ताधारी पक्षातील, तसेच विरोधी पक्षातील कुठलाही मंत्री, आमदार, खासदार जाहीर पाठींबा देत नाही. कॉग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करीत आहे. असे असताना मी त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे काम करु इच्छित नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून माझा आपल्या विषयी कुठलाही राग किंवा व्देष नाही. तुमचा सुध्दा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, शक्य झाल्यास तुम्हीसुध्दा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून समाजाला पाठींबा दयावा. अशी माझी विनंतीही केली आहे. मराठा आरक्षणाला वरिष्ठांचा विरोध असल्यामुळे मी राजीनामा देवून पूर्ण वेळ जरांगे पाटील यांना समर्थन देवून आरक्षण मिळण्यासाठी काम करणार आहे. असेही ते म्हणतात. आता नाही तर कधीच नाही, एकच मिशन मराठा आरक्षण ! कृपया माझा राजीनामा स्विकारण्यात यावा. असेही सर्जेराव पा. चव्हाण यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.