वाळूजमहानगर, ता.26 – बँकेने जप्त केलेली कंपनी विकत घेतल्याने 18 ते 20 जणांनी जबरदस्तीने कंपनीत घुसून सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी अँगल, पाईप, वेल्डींग मशीन, वेल्डींग रॉड असे जवळजवळ अडीच लाख रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील के सेक्टर येथे 21 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील के सेक्टर मधील भूखंड -218/2, ही मालमत्ता बँक ऑफ बडोदा शाखा सिडको, छत्रपती संभाजीनगर यांनी जप्त केली होती. ती कमलकुमार जिवनमल कोठारी (वय 54), रा. मुथियान रेसिडेन्सी रोहाऊस नं. 13 उल्कानगरी, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर यांनी 3 एप्रिल 2024 रोजी डीआरटी कोर्ट छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून 1 कोटी 50 लाख 72 हजार रुपये बँकला भरून खरेदी केली. त्यानंतर कोर्ट कमीशनर यांनी प्रत्यक्ष हजर येवून पोलीस बंदोबस्तात मिळकतीचा ताबा कोठारी यांना दिला. त्यानंतर कोठारी यांनी एमएसईबीकडून 19 नोव्हेंबर रोजी वीज घेऊन मिटर बसवले. तसेच लोखंडी वालकंपाऊंडसाठी लागणारे लोखंडी अँगल, पाईप दोन वेल्डींग मशीन, वेल्डींग रॉड असे साहित्य तेथे आनून ठेवले. तेथे देखरेख करण्यासाठी सेक्युरीटी गार्ड ताहेर खान यास ठेवले होते. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास सेक्युरीटी गार्ड ताहेर खान याने फोन करून कोठारी यांना माहिती दिली की, आपल्या कंपनीत कार (एम एच 43, बी के- 3391, एम एच 20, जी व्ही – 7807, एम एच 14, ए व्ही -2956, एम एच 09, डी ए- 6449) मध्ये 10 ते 12 पुरुष व 5 ते 6 महिला असे अंदाजे 18 ते 20 इसम कंपनीचे कुलूप तोडून आत आले. सिक्युरिटी गार्ड ताहेर खान यांनी त्यांना विचारपूस केली असता ते म्हणाले की, तु जास्त बोलू नको तुझे काही देणे घेणे नाही. जास्ती बोलला तर तुला जिवे मारून टाकील. अशी धमकी देवून कंपनीतील सामान घेवून जात असल्याची माहिती ताहेरखान याने दिल्याने कोठारी हे कंपनीत गेले. व तुम्ही कंपनीत कसे काय आले असे विचारले असता परमेश्वर नाझरकर याने ‘तूला तुझा जिव प्रिय असले, तर येथून निघून जा. नाहीतर तुला जिवे मारून येथेच गाडून टाकील’. अशी धमकी दिली. त्यामुळे कोठारी व वाचमन ताहेर खाने दोघे ही जिवाचे भितीने तेथून पळून आले. त्यानंतर आरोपींनी तेथील 32 हजार रुपये किमतीचे 2 वेल्डींग मशीन, 30 हजार रुपये किमतीचे वेल्डींग रॉड, 15 हजार रुपये किमतीचे वेल्डींगसाठी लागणारे इतर साहित्य, 42 हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल व पाईप, 1 लाख 20 हजार रुपये किमतीची लोखंडी जाळी, 6 हजार रुपयाचे 20 सिमेंट बँग असे 2 लाख 45 हजार रुपये किंमतीचे सामान बळजबरीने घेऊन गेले. याप्रकरणी कमलकुमार जिवनमल कोठारी यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी परमेश्वर नाझरकर व त्याच्या सोबतचे 10 ते 12 पुरुष व 5 ते 6 महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेने जप्त केली होती मालमत्ता –
कमलकुमार जिवनमल कोठारी यांनी खरेदी केलेली मालमत्ता ही मुळ मालक परमेश्वर नाझरकर यांनी बडोदा बँकेकडून कर्ज घेवून तारन ठेवली होती. त्यांनी वेळेवर कर्ज न फेडल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून ती जप्त केली होती.