March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज परिसरातील करोडी शिवारात दोन कंपन्यांना सोमवारी (ता.15) पहाटे 4 वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली असून दोन्ही कंपन्यांतील मशनरी तसेच रा-मटेरियल असा लाखोंचा ऐवज भस्मसात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

करोडी शिवारातील गट नंबर 40 मध्ये अब्दुल राजीक यांची ए. आर.प्लास्टिक या नावाची कंपनी आहे. या कंपनीत प्लास्टिक मटेरियल चे रि-सायकलिंग करण्यात येते. सोमवारी पहाटे सकाळी 4 वाजेच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. त्यामुळे कामगारांनी आरडाओरडा करून कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीतील प्लास्टिक मटेरियलमुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीची माहिती वाळूज अग्निशमन विभागाला देण्यात आली. या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान आग जास्त भडकल्याने लगतच्या चहा-कॉफीचे पावडर बनविणाऱ्या शाम चौधरी यांच्या श्रद्धा इंटरप्रायजेस या कंपनीला आगीने वेढले. या आगीच्या घटनेत शाम चौधरी यांच्या कंपनीतील मशनरी, कच्चा माल आगीत भस्मसात झाला. यावेळी वाळूज अग्निशमन दलाचे जवान व लगतच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करून सकाळी 8 वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.
 शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज –
ए आर प्लास्टिक या कंपनीला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अब्दुल राजीक यांनी वर्तविला आहे. या आगीत कंपनीतील मशनरी, रा- मटेरियल, फर्निचर आगीत जळाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे अब्दुल राजीक यांनी सांगितले. तर श्रद्धा इंटरप्रायजेस या कंपनीला आगीने वेढले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *