
वाळूजमहानगर,( ता.10) – बजाजनगर येथील वाळुज औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रोडलगत नाल्यांवर ढापे न टाकल्यामुळे त्या उघड्या पडलेल्या असून त्यात प्लास्टिक पिशव्या व केअर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. परिणामी येथील नागरिक व कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बजाजनगर या कामगार वसाहतीसह वाळूज औद्योगिक वसाहतीत सोयी, सुविधा पुरविण्याचे काम एमआयडीसीच्या वतीने करण्यात येते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या बाजूने मोठमोठ्या सिमेंट नाल्या करण्यात आलेल्या आहेत. रस्त्यावर साचणारे व काम बजाजनगर या कामगार वसाहतीतून येणारे पाणी सुरळीत वाहून जावे. या उद्देशाने या नाल्या करण्यात आल्या. त्यासाठी एमआयडीसी ने लाखो रुपये खर्च केला. विशेषत: पावसाळ्यात या नाल्या अत्यंत उपयुक्त आहेत. मात्र या नाल्यांवर काही तुरळक ठिकाणे वगळता अनेक ठिकाणी ढापे टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे परिसरातील प्लास्टिक पिशव्या व केरकचरा या नाल्यांमध्ये साचल्याने त्या तुडुंब भरलेल्या आहेत, माखलेल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक वाहनधारक येताजातांनी घरून आणलेला ओला व सुका कचरा या नाल्यांमध्ये फेकून देतात. याशिवाय या नाल्यांमध्ये परिसरातील मृत डुकरे, कुत्रे आणून टाकली जातात. बऱ्याचदा ही मृत जनावरे नाल्यांच्या काठावर पडलेले असल्याचे दिसून येतात. मृत जनावरे, ओला व सुका कचरा, वेगवेगळ्या प्लास्टिक पिशव्या, चिकन व मटन शॉप मधील टाकाऊ मास या नाल्यांमध्येच कुजून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. परिणामी येथील नागरिक, कामगार, व वाहनधारक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नाल्यांची वेळोवेळी साफसफाई करण्यात यावी. आणि येथील नागरिकांचे आरोग्य अमाधित ठेवावे. अशी मागणी होत आहे.

येथे एमआयडीसीने नाल्या बांधल्या. मात्र त्यावर ढापे टाकलेले नाही. शिवाय नाल्याच्याच कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. तेथे डुक्करं, कुत्रे व मोकाट जनावरे फिरतात. कचरा पसरवतात. तो नाल्यात पडतो. म्हणून या नाल्यावर ढापे टाकून सुरक्षित कराव्या.

तस पाहिलं तर बजाजनगर, एमआयडीसी हा परीसर कचरा माहेरघर म्हटलं तर वावग ठरणार नाही. कारण येथे असा कोणता रोड नाही, कोणता चौक नाही, की कोणतीही ओपन स्पेस नाही. जेथे कचरा नाही. येथील कचरा समस्यावर लवकर तोडगा काढला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी व सामाजिक राजकीय संघटनांनी आवाज उठवला पाहिजे. हा परीसर कचरामुक्त करण्यासाठी लवकरच आवाज उठवला जाईल.
