वाळूजमहानगर, (ता.3) :- वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील बेस्ट फिनिशर्स या कंपनीमधून 400 किलो वजनाचे लोखंडी बुश चोरी झाले. यातील सीसीटीव्हीत आलेल्या फुटेज वरून चार जणांवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) गट नंबर 34 मधील प्लॉट नंबर 27/1 मध्ये गजानन सिरसाट व गणेश पवार यांची भागीदारीने बेस्ट फिनिशर्स नावाने कंपनी आहे. बुधवारी (ता.29) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंपनीचे शटर बंद करून सर्व घरी गेले असता अज्ञात कंपनीत कोटींगसाठी आलेले 400 किलो लोखंडी बुश चोरून नेले. दुसर्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गणेश पवार हे शटर उघडण्यासाठी आले असता ही चोरीची घटना उघडकीस आली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले असून यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. याप्रकरणी गजानन सिरसाट यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोकॉ. बाबासाहेब काकडे हे करीत आहे.
…………….
