
वाळुज महानगर, (ता.20) – भरधाव जाणारा कंटेनर आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील मामा, भांजा आणि बहीण असे तीन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दहेगाव बंगल्याजवळ झाला. जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, शेंदूरवादा येथील मंगेश भगवान म्हस्के (वय 17), मिनाबाई भगवान म्हस्के (वय 40) आणि चंद्रकांत रामकिसन लोणकर (वय 50) हे मामा, भांजा आणि बहीण तिघेजण दुचाकी (एम एच 20, एचडी – 1235) ने शेंदूरवाद्यावरून शेणपुंजी रांजणगावला जात जात होते.
तर कंटेनर (एन एल 01, ए एफ – 4210) हा पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. दोन्हीही वाहने एकामागे एक जात असताना कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे पाठीमागील दुचाकी कंटेनरवर आढळली.
छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर दहेगाव बंगला येथे भारत पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मंगळवारी 19 रोजी सकाळी 10: 30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मंगेश म्हस्के, मिनाबाई म्हस्के आणि चंद्रकांत लोणकर हे तिघेजण जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी पॉईंटवर असणारी रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी नाणिज धाम यांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना संभाजीनगर जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले.
——————–
