
वाळूज महानगर, (ता.30) – बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून सातारा परिसरातील एसआरपीएफ कॅम्प येथील जवानांना राख्या बांधून एसआरपीएफ जवानांसोबत बुधवारी (ता.30) रोजी रक्षाबंधन साजरा केला. 
एसआरपीएफचे कर्तव्यदक्ष जवान यांना एखादा भारतीय सण- उत्सव आपल्या कुटुंब व घर परिवारातील सदस्यासोबत साजरा करण्याची संधी क्वचितच मिळते. सदैव त्यांना आपल्या कर्तव्यावर दक्ष रहावे लागते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र झटावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम टिकून कशी राहील याकरिता कटिबद्ध असलेल्या या जवानांना अनेक सण, उत्सव कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाही. त्यामुळे आपले सुद्धा काही कर्तव्य व जबाबदारी असते, ही बाब लक्षात घेऊन रक्षाबंधनाचा सण एसआरपीएफ जवानांसोबत साजरा करण्याची कल्पना शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी विद्यार्थिनी समोर मांडली.त्यास विद्यार्थिनींनी सकारात्मक प्रतिसाद दिला व सातारा परिसरातील एसआरपीएफ कॅम्प येथे विद्यार्थिनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना बांधल्या. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राख्या बांधल्याने सर्वच एसआरपीएफचे जवान भारावले. व विद्यार्थी बहिणींना ओवाळणी घातली. त्यावेळी डीवायएसपी विटेकर, पीएसआय शिंदे, पोलीस निरीक्षक खडूले तसेच पवार यांनी आपल्या चिमुकल्या बहिणीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कॅम्प मधील जवानांचे कर्तव्य व कार्याबद्दलची माहिती दिली तसेच अनुशासन व कर्तव्यसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
हा उपक्रम शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांच्या मार्गदर्शन व अनुमतीद्वारे यशस्वीरीत्या राबवण्यात आला. याकरिता शाळेतील शिक्षिका संध्या ढवळे, सारिका डोंगरे, विजया कोळी व अमोल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
