वाळूजमहानगर, (ता.16) – वाळूज पंढरपूर दरम्यानच्या नायगाव बकवालनगर येथे असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 13 लाख 92 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच एटीएम मशीनची मोडतोड करून व एसी युनिट जळुन नुकसान केले. ही घटना रविवारी (ता.16) रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर – पुणे महामार्गावरील वाळूज पंढरपूर दरम्यान गरवारे कंपनी समोरील नायगाव बकवालनगर येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आलेले आहे. रविवारी (ता.16) रोजी मध्यरात्रीनंतर 1:44 वाजता चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी एटीएम कक्षात प्रवेश करून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्पे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मशीनच्या लॉबी मधील कॅशेट (ट्रे) सह 13 लाख 92 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी हिताची पेमेन्ट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीचे चॅनल एक्झ्यीक्युटीव अविनाश रावसाहेब म्हस्के त्यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
-विशेष म्हणजे एटीएम मशीनला आग लागुन आतील भाग जाळलेला होता. व एटीएम कक्षात आग विझवण्यासाठी पाणी टाकण्यात आले. त्यामुळे संपुर्ण कक्ष काळसर राखेने चिखलमय झोलेला होता. कक्षातील वातानुकूलीत यंत्र जाळुन नुकसान झालेले होते.