वाळूजमहानगर, (ता.27) – हुमणी किडीचा कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून कृषी सहाय्यक ज्योती चितळकर यांच्या मार्गर्शनाखाली वळदगाव येथील शेती मित्र अनिकेत झळके यांच्या शेतामध्ये प्रकाश सापळा लावण्यात आला. यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती देत शेत तिथे सापळा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण प्रभावीपणे होईल. अशी मार्गदर्शनपर माहिती कृषी सहाय्यक ज्योती चितळकर यांनी दिली.
यावेळी चितळकर यांनी हुमणी किडीच्या अवस्था, नियंत्रण, औषध फवारणी व उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रकाश सापळा प्रत्येक शेतकऱ्यांनी लावण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी शकील पटेल, कृषी पर्यवेक्षक योगेश दिवेकर, कृषी सहाय्यक रंगनाथ पिसाळ यांनीही मार्गदर्शन करून प्रत्येक शेतकऱ्याने हा सापळा करण्याचे आवाहन केले केले. या प्रात्यक्षिकास कडू साबळे, विलास आदमाने, दिगंबर साबळे, योगेश झळके, नितीन साबळे, भरत चव्हाण, बासेद शेख, मजहर शेख, निलेश साबळे, हरीश साबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
हुमणी किडीची ओळख –
यावेळी त्यांनी या किडीची शेतकऱ्यांना प्रथमत: ओळख करून दिली. वर्षभर त्रस्त करणाऱ्या या किडीच्या चार अवस्था असतात.
पहिली अवस्था –अंडी अवस्था असून मादी भुंगेरा पावसाळा सुरू होताच म्हणजे जूनच्या मध्यावर जमिनीमध्ये 20 सेमी खोलीवर मटकी किंवा ज्वारीच्या आकाराची पांढरट ते तांबूस रंगाची सरासरी 50-60 अंडी घालते. ही अवस्था 10 ते 15 दिवसांची असते.
दुसरी अवस्था – ही अळी अवस्था असून अळीच्याही 3 अवस्था आहे. सरासरी सहा ते आठ महिन्यांचा अळीचा कालावधी असतो. या अवस्थेत अळी विविध पिकांच्या मुळ्या कुरतुडून त्यावर उपजीविका करते. त्यामुळे पिकाच्या झाडाला अन्न व पाणी जमिनीतून घेता येत नसल्याने पाने पिवळी पडत जाऊन नंतर पूर्ण झाडच वाळून जाते. या अळीचा जास्त प्रादुर्भाव हा ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये होत असतो.
तिसरी अवस्था – ही कोषावस्था असून 20 ते 40 दिवसांची असते. अळीपासून तयार झालेला कोष हा पांढरट रंगाचा असून तो नंतर लालसर होत जातो.
चौथी अवस्था – भुंगेरा अवस्था असून कोष अवस्थेतून बाहेर पडलेला भूंगेरा पुरेसा पाऊस पडेपर्यंत जमिनीमध्ये तीन ते पाच महिने काहीही न खाता सुप्त अवस्थेत पडून राहतो, आणि पहिला पाऊस पडल्यानंतर म्हणजे मे, जून मध्ये जमिनीमधून संध्याकाळी साधारणतः 7 ते 9 या वेळेत बाहेर पडतात. कडुलिंब, बाभूळ, बोर, गुलमोहर अशा शेताच्या सभोवताली असणाऱ्या 56 प्रकारच्या झाडांवर राहून पाने अर्धचंद्राकृती खाऊन उपजीविका करतात. हे भुंगेरे सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी 5.40 ते 6 वाजेपर्यंत पुन्हा जमिनीमध्ये जातात. हे भुंगेरे साधारणतः 93 ते 109 दिवस जगतात.
नियंत्रण कसे करावे –
भुंगेरे यांच्या नियंत्रणासाठी कडुनिंब, बाभूळ, बोर यांसारख्या झाडांवर इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के एस एल 3 मिली किंवा क्लोरीपायरिफॉस 50 टक्के 2.5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. किंवा फवारणी केलेल्या या झाडांच्या फांद्या शेतामध्ये ठीकठिकाणी ठेवाव्यात. यामुळे विषारी पाने खाल्ल्याने भुंगेरे नियंत्रणात येते.
हुमणी अळी नियंत्रणासाठी ही अळी सुरुवातीला बाल्यावस्थेत सेंद्रिय पदार्थांवर जगत असल्याने खरिपातच शेणखताबरोबर 20 किलो मेटेरायझीम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या सारख्या जैविक बुरशी मिसळून शेणखत जमिनीत टाकावे. तसेच मेटेरायझीम ॲनिसोप्ली ही बुरशी 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करणे, मेटेरायझीम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बुरशी 50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी मिसळून पहारीने केलेल्या खड्ड्यात आळवणी करावी. अधिक माहिती संबंधित जैविक औषधे कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध होईल.